ओमीक्रॉनची दहशत; रत्नागिरीतील पर्यटनस्थळे पुन्हा बंद 

रत्नागिरी ः- कोरोनाची दुसरी लाट ओसरल्यानंतर पुरातत्वविभागासह विविध पर्यटन स्थळे पर्यटकांसाठी खुली करण्यात आली; मात्र दोनच महिन्यात ओमीक्रॉनने हातपाय पसरायला सुरवात केल्यामुळे रत्नागिरी शहरातील थिबापॅलेस, लोकमान्य टिळक जन्मस्थान आणि मत्स्यालय हे पर्यटकांसाठी बंद करण्यात आले आहे. त्यामुळे पुन्हा रत्नागिरीत येणार्‍या पर्यटकांना किनार्‍यांशिवाय दुसरा पर्यायच उरलेला नाही.

पर्यटनाला चालना मिळावी यासाठी गतवर्षी दिवाळीच्या तोंडावर कोरोनामुळे बंद केलेली पर्यटनस्थळं, मंदिरे पर्यटकांसाठी बंद करण्याचा निर्णय शासनाने घेतला. गेल्या पंधरा दिवसात ओमीक्रॉनचे बाधित वाढू लागले आहेत. रत्नागिरी जिल्ह्यातही कोरोनाचे बाधित दरदिवशी वाढत आहेत. एकाच दिवसात दोनशे बाधितांची नोंदही झाली आहे. ख्रिसमस आणि नवीन वर्ष स्वागतावेळी परजिल्ह्यातील पर्यटकांनी रत्नागिरीतील पर्यटनस्थळांवर हजेरी लावली होती. त्यामुळे पर्यटन रोजगारालाही चालना मिळाली; परंतु ओमीक्रॉनचे रुग्ण वाढल्याने राज्य शासनाकडून निर्बंध लागू करण्यास सुरवात झाली आहे. त्याचा पहिला परिणाम पर्यटनावर झाला आहे. सुदैवाने मंदिरे सुरु असल्यामुळे अनेक पर्यटक कोरोनाचे नियम पाळत किनार्‍यांवर फिरायला येत आहेत. त्यांचे प्रमाण अल्प असले तरीही व्यावसायीकांसाठी दिलासादायक आहे. पर्यटकांना रत्नागिरीत फिरण्यासाठी पर्यायी ठिकाणे म्हणून थिबापॅलेस, लोकमान्य टिळक जन्मस्थान, मत्स्यालय याला प्राधान्य दिले जाते. दोनच दिवसांपुर्वी जिल्हा प्रशासनाच्या आदेशानुसार गर्दी टाळण्यासाठी ही तिन्ही पर्यटन स्थळं बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. याचा फटका पर्यटक व्यावसायीकांना बसला असून रत्नागिरीत निवासासाठी येणार्‍यांचा कल कमी होणार आहे.