रत्नागिरी:- ओबीसी संघर्ष समन्वय समिती जिल्हा रत्नागिरी यांच्यावतीने 26 नोव्हेंबर रोजी ओबीसी जातनिहाय जनगणना, संख्येच्या प्रमाणात प्रतिनिधीत्व, ओबीसींना संविधानिक हक्क अधिकार व ओबीसींच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढला जाणार आहे.
अनेक वर्षे ओबीसी समाजाला उपेक्षित ठेवण्याचे काम आजपर्यंतच्या व्यवस्थेने केले आहे. या बाबत अनेक ओबीसी संघटना वेगवेगळ्dया माध्यमातून चळवळ उभी करून आपले हक्क आणि अधिकार मिळविण्यासाठी विविध प्रकारे प्रयत्न करत आहेत. मात्र आता आपले सर्वांचे उद्दिष्टे एक आहेत. तर सर्व संघटनांनी आपापसातील मतभेद दूर करून एकत्र लढ्यात सामील होऊन बहुसंख्य म्हणून आपली ताकद दाखवण्याची वेळ आली आहे. रत्नागिरी जिह्यातील अनेक तालुक्यांतून मोर्चा बांधणी सुरू झाली आहे. मोर्चात मोठ्या संख्येने जनआंदोलन करण्यासाठी जिल्हा समन्वय समितीने कंबर कसली असून रत्नागिरी तालुक्यात विविध ठिकाणी ओबीसी सभा घेऊन जनजागृती करण्याचे व मोर्चाचे नियोजन काम सुरू आहे. रत्नागिरीत मोर्चा असल्याने रत्नागिरी तालुक्याने त्या नियोजनाची मोठी जबाबदारी स्वीकारलेली आहे. त्यासाठी या संपूर्ण मोर्चाचे नियंत्रण करण्यासाठी ओबीसी संघर्ष समन्वय समिती तालुका रत्नागिरी यांची नुकतीच येथील शामरावजी पेजे सभागृह, कुणबी भवन, जे. के. फाईलजवळ रत्नागिरी येथे आज गुरूवार 18 नोव्हेंबर रोजी सकाळी 10.30 वा. सभा होणार आहे. सभेला ओबीसी संघर्ष समन्वय समिती कार्यकारिणी पदाधिकारी, ओबीसी गटनिहाय पदाधिकारी, नगरसेवक, जिल्हा परिषद सभापती, सदस्य, सरपंच, उपसरपंच, रत्नागिरी परिसरातील ओबीसी नेते, गावप्रमुख उपस्थित रहावे, असे आवाहन समन्वय समितीच्यावतीने करण्यात आले आहे. संपूर्ण जिल्हाभरातून सभेला येणाऱया बंधूभगिनीच्या गाड्या पार्किंग व्यवस्था, पाणी व्यवस्था, मोर्चाचा मार्ग निश्चित करणे, संबंधित यंत्रणेची व्यवस्था, स्पिकर व्यवस्था, स्वयंसेवक, वाहतूक व्यवस्था, शासकीय परवानगी, विचार मंच, स्लोगन, वक्ते व सर्वात महत्वाचे तालुक्यातून विभागवार ओबीसी बंधूभगिनी यांची येणारी संख्या या सर्व गोष्टींची जबाबदारी व विभागणी करून विराट मोर्चाचे सुसूत्र नियोजन केले जाणार आहे. मोर्चाच्या नियोजन सभेला सर्वांनी हजर रहावे, असे आवाहन ओबीसी संघर्ष समन्वय समिती तालुका रत्नागिरी यांच्यावतीने अध्यक्ष नंदकुमार मोहिते, उपाध्यक्ष राजीव कीर, महेश (बाबू) म्हाप, दीपक राऊत, सुधीर वासावे यांनी केले आहे.