राजापूर:- सौंदळनजीक ओझरकोंड धबधब्यावर सेल्फी काढताना पाय घसरल्याने अठरा वर्षीय तरूण डोहात बुडाल्याची घटना बुधवारी सायंकाळी साडेसहाच्या दरम्यान घडली. निखिल मंगेश मोहिते (वय १८) असे बुडालेल्या तरुणाचे नाव आहे. गुरुवारी दुपारपर्यंत त्याचा शोध घेण्याचे काम सुरू होते.
सौंदळ येथील निखिल मोहिते आणि त्याचे काही मित्र हे परिसर पाहण्यासाठी बुधवारी सायंकाळी बाहेर पडले होते. ते सौंदळनजीक ओझर कोंड येथील धबधब्यावर आले असता निखिल उंचावरून सेल्फी काढण्यासाठी गेला. सेल्फी काढत असताना अचानक निखिलचा पाय घसरला आणि सुमारे दोन फूट उंचावरून तो खाली धबधब्याच्या डोहात कोसळला. अचानक घडलेल्या प्रकाराने त्याचे सहकारी हादरून गेले. त्यांनी त्याला वाचविण्याचा प्रयत्न केला. सुमारे तीस फूट एवढ्या खोल डोहात निखिल बुडाला. गावकऱ्यांना बातमी कळल्यानंतर धबधब्याच्या दिशेने त्यांनीधाव घेतली. डोहात त्याचा शोध लागला नव्हता. त्यासाठी स्कुबा ड्रायव्हरना पाचारण करण्यात आले. ते देखील निखिलचा शोध घेत होते. मात्र त्याचा मृतदेह उशिरापर्यंत सापडला नाही.