रत्नागिरी सायबर पोलिसांची बेंगलोर येथे कारवाई; टोळी उध्वस्त
रत्नागिरी:- हॉट बोट व इझी लोन या अॅपवरुन घेतलेले लोन परत करा अशी धमकी देवून फिर्यादी यांनी लोनची रक्कम परतफेड केली असतानाही अधिक रक्कम देणेकरीता फिर्यादी यांचे वैयक्तीक फोटो अश्लिल स्वरुपात एडीट करुन तसेच काही फोटोवर बदनामीकारक मजकुर टाईप करुन फिर्यादी व त्यांचे पती तसेच नातेवाईक यांना इंटरनेटचा वापर करून व्हॉटसअपद्वारे पाठविण्यात आले होते. फिर्यादी यांचे मॉर्फ केलेले फोटो व बदनामीकारक संदेश इंटरनेटद्वारे फिर्यादी तसेच अन्य व्यक्तींना पाठवले म्हणून सायबर पोलीस ठाणे येथे भा.द.वि.क. 420, 34 माहिती तंत्रज्ञान अधिनियम 2000 चे कलम 67 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.
गुन्ह्याच्या तपासादरम्यान आरोपीत हा बेंगलोर येथे असल्याची माहिती मिळाल्याने सायबर पोलीस ठाणे येथील पोहेकॉ रामचंद्र वडार, पोहेकॉ संदीप नाईक, पोकॉ सौरभ कदम असे पथक दि. 9 ऑगस्ट रोजी बेंगलोर, राज्य कर्नाटक येथे गेले होते . तेथील पत्त्यावर जाऊन चोकशी करता आरोपी हा त्याचे गावी दोड्डानकेरी, राज्य आंध्रप्रदेश येथे गेल्याचे समजल्याने अधिक तांत्रिक माहीती प्राप्त करुन पथक बेंगलोर येथुन तात्काळ तेथे रवाना झाले. तेथील स्थानिक पोलीस व गोपनीय माहीतीच्या आधारे तो राहत असलेल्या परिसरात शोध घेऊन आरोपीत बुधीजागुल्ला राजशेखर याचा शोध घेण्यात आला.
आरोपितकडे केलेल्या तपासावरुन आरोपी याने नरसिंम्हा नामक व्यक्तीस आजतागायच एकूण 06 बँक खाती वापरण्यास दिलेली आहेत. या बँक खात्यांचा वापर नरसिंम्हा हा लोकांना फसवून त्यांचेकडून पैसे घेण्यासाठी करीत होता व त्याचा मावस भाऊ बुधीजागुल्ला विजय याच्या नावे सिमकार्ड हे वापरत होते. त्यानंतर तपासामध्ये मिळालेल्या माहीतीच्या आधारे आरोपी नरसिंम्हा हा सध्या राजराजेश्वरी नगर, बेंगलोर येथे रहात असल्याचे निष्पन्न झाल्याने सदर ठिकाणी आरोपीत याचा शोध घेण्यात आला. गुन्ह्यातील आरोपी यांनी स्वतःचे तसेच इतरांचे आधारकार्ड व पॅनकार्डचा वापर करुन सुमारे 35 ते 40 व्यक्तीकडुन त्यांनी बँक खात्याला लिंक असेलेला मोबाईल क्रमांक, बँक युझर आयडी व पासवर्ड घेऊन रिकव्हरी लोन अॅप कडुन आलेली रक्कम ही त्याखात्यांमध्ये वळती करुन त्याव्दारे लोकांची फसवणूक करत असल्याचे समोर आले.
त्यामुळे आरोपी नरसिंम्हा नरसप्पा,( वय- 24 वर्षे शिक्षण- डिप्लोमा (मेकॅनिकल), रा- राजराजेश्वरी मंदिर, केंचनहल्ली, जनप्रिया अबोर्डस् च्या शेजारी, तिसरा क्रॉस, शिट हाऊस, बेंगलुरु व बुधिजागुल्ला राजशेखर, (वय- 20, मु.पो. डोड्डनगिरी, ता.आदोनी, जि.कर्नुल, राज्य आंध्रप्रदेश सध्या राजराजेश्वरी मंदीराजवळ, जनप्रिया अॅबोट, केंचनहल्ली, राजराजेश्वरी नगर, बेंगलोर दोन्ही आरोपी यांना दि. 18 ऑगस्ट रोजी 19.39 वा. अटक करण्यात आलेले आहे.
या गुन्ह्याचा तपास व आरोपीस अटक करण्याकरीता पोलीस अधीक्षक, रत्नागिरी व अपर पोलीस अधीक्षक, रत्नागिरी यांचे मार्गदर्शनाखाली पोनि श्री.अमित यादव, पोहेकॉ रामचंद्र वडार, पोहेकॉ संदीप नाईक, पोकॉ सौरभ कदम, पोकॉ निलेश शेलार (तांत्रिक विश्लेषण शाखा) यांनी कामगिरी केली.