ऑगस्ट महिना ठरणार सुट्ट्यांचा महिना; 11 दिवस शासकीय कार्यालये, बँका राहणार बंद

रत्नागिरी:- ऑगस्ट महिन्याच्या कॅलेंडरवर नजर टाका, ऑगस्ट महिन्यात एक दोन नव्हे, तर तब्बल 11 दिवस शासकीय कार्यालये आणि बँका सुट्टीमुळे बंद राहणार आहेत. यामुळे गैरसोय टाळण्यासाठी नागरिकांनी दैनंदिन आवश्यक व्यवहार त्या आधीच पूर्ण करून घ्यावेत.

धावपळीच्या आजच्या जीवनात अनेकांचे कॅलेंडरकडे फारसे लक्ष नसते. सुट्टीमुळे अचानक अडचणींचा सामना करावा लागू शकतो. 11 दिवस बँकांना सुट्टी असल्याने एटीएमवर मोठा ताण मात्र निश्चित पडणार आहे. शासकीय कार्यालये देखील बंद राहणार असल्याने महसुली, जमीन व्यवहार, सहकार क्षेत्र, चेक क्लिअरिंग, शाळा, कोर्ट केसेस, पंचायत समितीतील व्यवहार आणि अन्य खात्याचा यामध्ये समावेश आहे. 7 ऑगस्ट रविवारपासून सुट्टीची मालिका सुरू होणार आहे. हिंदू-मुस्लिम धर्मियांचे सण ऑगस्ट महिन्यात असल्याने सुट्ट्यांची संख्या अधिक दिसून येते.

9 ऑगस्टला मोहरम सण आहे. 13 आणि 27 ऑगस्टला दुसरा आणि चौथा शनिवार तर 14, 15, 16 ऑगस्टला सलग सुट्टी आहे. 28 ऑगस्टला रविवार तर 31 ऑगस्टला श्री गणेश चतुर्थीची सुट्टी आहे. ऑगस्ट महिन्याचे वैशिष्ट्य म्हणजे मोहरम, नारळी पौर्णिमा, रक्षाबंधन, श्रीकृष्ण जयंती, पारसी नूतन वर्ष, स्वातंत्र्य दिन, गोपाळकाला असे महत्त्वाचे सण आणि दिवस याच महिन्यात आहेत. या सलग सुट्ट्यांमुळे मात्र सर्वसामान्यांची अडचण वाढणार आहे हे मात्र निश्चित.