ऐन नुकसानीच्या काळात पिक विमा कंपनीचा टोल फ्री क्रमांक बंद

रत्नागिरी:- पिक विमा कंपनीचा टोल फ्री क्रमांक लागत नसल्यामुळे रत्नागिरी तालुक्यातील शेतकर्‍यांची गैरसोय होत आहे. याबाबत तालुका कृषी अधिकार्‍यांकडे तक्रारी आल्या असून संबंधित विमा कंपनीकडून तत्काळ पावले उचलली जावीत अशा सुचना तालुका कृषी अधिकार्‍यांनी दिल्या आहेत.

मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील शेतकर्‍यांचे मोठे नुकसान झाले आहे. कुणाची शेती वाहून गेली, तर कुणाच्या शेतात पुराचे पाणी साचलेेले आहे. जिल्ह्यातील साडेसातशे शेतकर्‍यांनी विमा उतरवलेला आहे. त्यातील अडीचशे शेतकरी रत्नागिरी तालुक्यातील आहेत. विमा परतावा देण्याचे निकष ओखी वादळाच्यावेळी सरकारकडून बदलण्यात आले होते. नुकसान झालेल्या शेतकर्‍यांना सरसकट भरपाई मिळाली होती. त्यानुसार यंदाही तशीच काहीशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. ज्या शेतकर्‍यांनी विमा उतरवला आहे. त्यांच्याकडून दोन दिवसात संबंधित नुकसानग्रस्त शेतीची तपासणी करणे बंधनकारक आहे. त्यानुसार रत्नागिरीतील शेतकर्‍यांकडून विमा कंपनीच्या टोल फ्रि क्रमांकवर नुकसानीची माहिती देण्यासाठी फोन केले होते; मात्र काहींना प्रतिसाद मिळाला नाही. अनेकवेळा बिझी लागत होता तर काहीवेळा फोनची रिंगच वाजत राहत होती. शेतकर्‍यांना विमा प्रतिनिधींची वाट बघत रहावे लागणार होते. कंपनी प्रतिनिधीने भात तसेच ठेवून द्या, आम्ही पाहून जाऊ असे सांगितले.

शेतकर्‍यांच्या तक्रारींची दखल घेत रत्नागिरी तालुका कृषी अधिकारी विनोद हेगडे यांनी विमा कंपनीला पत्र पाठवत सुचना केली आहे. त्या पत्राची प्रत जिल्हाधिकारी यांनाही सादर केली आहे. रत्नागिरीतील शेतकर्‍यांच्या भात पिक क्षेत्राचे 1 ते 15 ऑक्टोबर या कालावधीत परतीच्या पावसामुळे शेतात जलभराव झाला आहे. कापणी केलेल्या भात पिकाचे नुकसान झाले आहे. हे नुकसान काढणी पश्‍चात विभागात मोडते. सध्या झालेल्या नुकसानीची माहिती देण्यासाठी काही गावात नेटवर्क नाही, तर काहींचा संपर्क झालेला नाही. नुकसानग्रस्त शेतकर्‍यांचे कृषी विभागाकडून पंचनामे कार्यवाही पूर्ण नुकसानग्रस्त शेतकर्‍यांना नुकसान भरपाई मिळण्याची कार्यवाही करावी अशा सुचना पत्राद्वारे केल्या आहेत.