बस चालकावर गुन्हा दाखल
मंडणगड:- तालुक्यातील बाणकोट येथे कातकोंड येथील वळणावर एस.टी. बसने ट्रकला समोरासमोर दिलेल्या धडकेत 7 बसमधील प्रवासी जखमी झाल्याची घटना बुधवार 13 जुलै रोजी सकाळी 7.30 वा. च्या सुमारास घडली. याबाबतची फिर्याद कृष्णदेव जगताप (47, मंडणगड, रत्नागिरी) यांनी बाणकोट पोलीस स्थानकात दिली. त्यानुसार एस. टी. बस. चालक संपतराव आप्पा सावंत (49, येवगाव, कडेगाव, सांगली) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कृष्णदेव जगताप हे बाळू हणमंत सुतार (जि. सातारा) यांच्या गाडीवर ड्रायव्हर म्हणून काम करतात. 13 जुलै रोजी जगताप हे आपल्या ताब्यातील ट्रक घेवून अशोक मांढरे यांच्या घरी मंडणगड ते बाणकोट असे ट्रकमधून सामान घेवून जात असताना कातळकोंंड येथील वळणावर समोरुन येणार्या एस.टी. बसने विरुध्द दिशेला येवून ट्रकला जोरदार धडक दिली. या धडकेत एस.टी. बस मधील 7 प्रवासी जखमी झाले. मंजुळा मोहिते (72, वेसवी, बौध्दवाडी), जमीर जुवळे (65, शिपोळेबंदर), मासुम मिर्झा कुरुये (21, वेसवी), अल्फिया उन्ड्रे (18, बाणकोट), नबिला मिरकर (21, बाणकोट), अजिरा मिरकर (70, बाणकोट), मोहन पवार (43, देव्हारे, मंडणगड) असे 7 प्रवासी जखमी झाले.
कृष्णदेव जगताप यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार बस चालक संपतराव सावंत याच्यावर भादविकलम 279, 336, 337 मोटर वाहन कायदा कलम 184 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.