रत्नागिरी:- टाळेबंदीतून काहीशी सुट दिल्यानंतर काही अटींवर जिल्ह्याअंतर्गत एसटी वाहतूक सुरू केली. आठवडा झाला तरी दिवसभरातील 52 गाड्यांच्या फेर्यांना अल्प प्रतिसाद मिळत आहे. 22 प्रवाशी अपेक्षित असताना 3 किंवा 10 ते 12 प्रवासीच मिळत आहेत. एसटीची प्रवासी वाहतुक सुरू झाली आहे, हे जनतेला माहिती व्हावे, यासाठी एसटीने तोट्यातील या फेर्या सुरूच ठेवल्या आहेत. यावरून एसटी भारमान काही वाढता वाढेना, अशी परिस्थिती झाली आहे.
राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वेगाने सुरू आहे. या विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी राज्यात दोन नव्हे तर चार टप्प्यात लॉकडाऊन करण्यात आले. अर्थव्यवस्था सुरू व्हावी यासाठी चौथ्या टप्प्यातील लॉकडाउनमध्ये अटी शर्थी घालून शिथिलता देण्याचा निर्णय शासनाने घेतला. म्हणून 22 मेपासून जिल्हाअंतर्गत एसटी वाहतूक सुरू करण्याचा निर्णय झाला. एसटी प्रशासनाने सोशल डिस्टन्सी, मास्क आणि सॅनिटायझर आदी अटी सक्तीच्या करून ही वाहतूक सुरू केली. जिल्ह्यात 52 एसटींच्या सुमारे 94 फेर्या सुरू आहेत. नऊही आगारातून ही प्रवासी वाहतूक सुरू आहे. मात्र आज एक आठवडा झाला, तरी अपेक्षित प्रवासी किंवा भारमान वाढल्याचे दिसत नाही. एसटीला कमीत कमी 22 प्रवाशांची गरज आहे. मात्र तेवढे प्रवासी मिळत नसल्याने अवघे 3 प्रवासी किंवा जास्तीत जास्त 10 ते 12 प्रवासी घेऊन एसटीला तोट्यातील फेर्या माराव्या लागत आहेत. लांजा, देवरूख आगारात मात्र 22 प्रवासी मिळत आहेत. एसटीची प्रवासी वाहतूक सुरू झाली आहे, हे लोकांच्या लक्षात यावे, यासाठी तोटा सोसूनच एसटीने प्रवासी वाहतूक सुरू ठेवली आहे. कोरोनाबाबत नागरिकांच्या मनात भीती असल्याने लोक घराबाहेर पडत नसल्याचे यावरून दिसत आहे. पावसाळ्यात एसटी फेर्या वाढविण्यात येणार आहेत. मात्र त्याचे नियोजन अजून झालेले नाही, असेही एसटी प्रशासनाने सांगितले.