रत्नागिरी:- एसटी महामंडळाचे राज्य सरकारमध्ये विलीनीकरण करण्याच्या मागणीसाठी एसटी कर्मचारी पुकारलेल्या बेमुदत बंद आंदोलनात फूट पडल्यानंतर आता राज्य सरकार मंगळवारी सायंकाळी परिपत्रक काढून एसटी कर्मचारी सेवेत येण्याची अखेरची संधी दिली आहे. बुधवार दि. २२ डिसेंबर रोजी सेवेत दाखल होणाऱ्या कर्मचार्यांना पुन्हा सेवेत हजर करून घेण्याचे आदेश देण्यात आले आहेत,परंतु ही अखेरची संधी कर्मचाऱ्यांना देण्यात आली आहे. त्यामुळे कर्मचारी आज काय निर्णय घेणार यावरच त्यांच्या नोकरीचे भवितव्य अवलंबून आहे. तर बंद कालावधीत करण्यात आलेल्या गुन्ह्यांसह सर्व कारवाया रद्द करण्याची घोषणा एसटी महामंडळाने केली आहे.
एसटी महामंडळाच्या मध्यवर्ती कार्यालयाने मंगळवारी सायंकाळी काढलेल्या परिपत्रकानुसार महाराष्ट्र राज्य कनिष्ठ वेतनश्रेणी एसटी कामगार संघटनेने समवेत केलेल्या चर्चेनंतर संघटनेचे अध्यक्ष अजयकुमार गुजर यांनी संप मागे घेत असल्याचे जाहीर केले. तर कर्मचार्यांना पुन्हा सेवेत हजर होण्याचे आव्हान केले होते.याच बैठकीचा आधार घेत मंगळवारी सायंकाळी महामंडळाने नवा आदेश जारी केला आहे.
त्यानुसार नियमबाह्यरित्या आंदोलनात सहभागी झालेल्या कर्मचार्यांनी दि.२२ डिसेंबर रोजी पुन्हा सेवेत हजर व्हावे. हजर होण्यासाठी येणार्या कर्मचार्यांना तात्काळ सेवेत रुजू करून घेण्याचे आदेश विभागीय कार्यालयाला देण्यात आले आहेत. आगरातील वाहतूक पूर्ववत सुरू झाल्यानंतर हजर झालेल्या कर्मचाऱ्यांचे निलंबन तात्काळ प्रभावाने मागे घेण्यात यावे. ज्या कर्मचाऱ्यांना बडतर्फ करण्यात आले आहे अशा कर्मचाऱ्यांच्या प्रकरणी शिस्त आवेदन कार्यपद्धतीनुसार बडतर्फी मागे घेण्यात यावी. ज्या कर्मचार्यांची सेवा समाप्त करण्यात आली आहे. त्यांची सेवा समाप्तीचा आदेश मागे घेण्यात यावा. कर्मचार्यांची संप कालावधीत अन्यत्र बदली करण्यात आली आहे. ते आदेश तात्काळ रद्द करण्यात यावे तर ज्या कर्मचार्यांवर पोलीस स्थानकात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत त्याबाबत कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून तक्रारी मागे घेण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या सर्व सवलतील सेवेत येणार्या कर्मचार्यांसाठीच असल्याचे परिपत्रकात नमुद करण्यात आले आहे.अजयकुमार गुजर यांनी संपातून माघार घेतल्यानंतरही काही कर्मचाऱ्यांनी आंदोलनाच्या भूमिकेवर ठाम राहण्याचा निर्णय घेतला आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील काहि कर्मचारी सेवेत पुन्हा हजर झाले असले तरीही रत्नागिरी विभागीय कार्यालयासह रत्नागिरी आगारातील कर्मचारी संपावर ठाम आहेत. जिल्ह्यातील ३ हजार ७७९ कर्मचारी पैकी ७०० कर्मचारी सेवेत हजर झाले आहेत,तर ३ हजार ७९ कर्मचारी अद्याप संपात सहभागी आहेत. आज सेवेत पुन्हा हजर होण्याची ही अखेरची संधी राज्य सरकारसह महामंडळाने दिली आहे. त्यामुळे आज किती कर्मचारी हजर होतात त्यावरच सरकारची पुढील भूमिका निश्चित होण्याचीची शक्यता आहे.