रत्नागिरी:- एस.टी.कर्मचार्यांच्या लढ्याची शंभरी पूर्ण झाली आहे. विलिनीकरणाच्या मुद्द्यावरुन संपावर गेलेल्या एस.टी. कर्मचार्यांच्या संपाला उद्या मंगळवारी 100 दिवस पूर्ण होत असून या 100 दिवसांत 237 कर्मचार्यांची सेवा समाप्त झाली आहे. तर एस.टी.चे 100 दिवसांत 70 कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे.
विलिनीकरणाच्या मुद्द्यावरुन राज्यात एस.टी. कर्मचार्यांनी संपाची हाक दिली. राज्यभरात याचे पडसाद जोरदार उमटले. सर्वत्र एस.टी.ची वाहतूक ठप्प झाली. सर्वच एस.टी. आगाराबाहेर कर्मचार्यांचे साखळी उपोषण सुरू झाले. सर्वसामान्यांची एस.टी. बंद झाल्याने ग्रामीण भागाचा शहराशी संपर्क तुटला होता.
एस.टी. कर्मचार्यांनी राज्यभर आंदोलन सुरू केलं. मुंबईतील आझाद मैदानात मोठ्या संख्येने कर्मचार्यांचं आंदोलन सुरू झालं. सुरुवातीला आमदार सदाभाऊ खोत, गोपिचंद पडळकर यांनी या आंदोलनाचं नेतृत्त्व केलं. मात्र परिवहन मंत्री अनिल परब यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीनंतर खोत व पडळकर यांनी संपातून माघार घेतली.
सुरुवातीला हा वाद मुंबई उच्च न्यायालयात गेला. न्यायालयाने विलिनीकरण करण्यासंदर्भात एक उच्चस्तरीय त्रिसदस्यीय समिती नियुक्त केली. या समितीला ठराविक मुदत देण्यात आली होती. या मुदतीत समितीने अहवाल न्यायालयात सादर करायचा होता. मात्र अहवाल अवघ्या काही दिवसांत जाईल या शक्यतेने कर्मचार्यांनी अहवालाकडे लक्ष ठेवले होते.
सध्या उच्च न्यायालयात ‘तारीख पे तारीख’ सुरू असून एस.टी. कर्मचार्यांची द्विधा मनस्थिती झाली आहे. हजर व्हायचं की न्यायालयात अहवाल दाखल झाल्यानंतर पुढील निर्णय घ्यायचा यामध्ये कर्मचार्यांमध्ये एकमत होत नव्हते. अखेरीस अहवाल दाखल झाल्यानंतरच संपाबाबत निणृय घेण्याची भूमिका एस.टी. कर्मचार्यांनी घेतली आहे.
एस.टी. कर्मचार्यांच्या संपाला उद्या मंगळवारी 100 दिवस पूर्ण होत आहेत. संपाची शंभरी पूर्ण झाली असली तरी 100 दिवसांत एस.टी. कर्मचार्यांच्या पदरी उपेक्षाच आली आहे. तर काही कर्मचार्यांना कारवाईला सामोरं जावं लागलं आहे.
एस.टी. कर्मचार्यांना सहानुभूती दाखवत अनेक नेत्यांनी एस.टी. कर्मचार्यांच्या आंदोलनाला उपस्थिती लावली. मोठमोठी भाषणं ठोकली. भाषणाचे व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केले मात्र या कर्मचार्याचे प्रश्न सोडवण्यासाठी एकाही नेत्याने वरिष्ठ पातळीवर बाजू मांडली नाही. सर्वच नेते सपशेल अपयशी ठरले आहेत.
उद्या मंगळवारी एस.टी. कर्मचार्यांच्या संपाला 100 दिवस पूर्ण होत असतानाच या 100 दिवसांत संपावर गेलेल्या कर्मचार्यांवर विभागीय कार्यालयामार्फत कारवाई झाली आहे. त्यामध्ये 237 कर्मचार्यांची सेवा समाप्त झाली असून 237 कर्मचारी बडतर्फ झाले आहेत.
नेहमीच तोट्यात असलेली एस.टी. आज कर्मचार्यांच्या संपामुळे अधिकच नुकसानीत गेली आहे. एस.टी.ला दरदिवशी रत्नागिरी विभागातून 60 ते 70 लाखांचे उत्पन्न मिळत होते. मात्र 100 दिवसांत हे उत्पन्न थांबल्याने 70 कोटींचा तोटा सहनन करावा लागला आहे.
एस.टी. वाहतूक ठप्प झाल्यानंतर प्रवाशांनी खाजगी वाहतुकीला पसंती दिली आहे. आज अनेक खाजगी वाहने एस.टी.चे प्रवासी घेऊन धावत आहेत. एस.टी. संपामुळे आपसूकच खाजगी वाहतुकीला बळ मिळाले आहे.
एस.टी.चं भारमान वाढावं यासाठी एस.टी. महामंडळाकडून विविध उपक्रम हाती घेतले जातात. मात्र या संपामुळे एस.टी.चा प्रवासीच दुरावला आहे. येत्या काही दिवसांत एस.टी. पुन्हा सुरू झाली तर दुरावलेला प्रवासी एस.टी.कडे वळणार कसा? असा प्रश्नदेखील उपस्थित झाला आहे.
संपावर गेलेले कर्मचारी कामावर रुजू होत नसल्याने रत्नागिरी विभागाला नवीन 50 चालक भरण्याची परवानगी एस.टी.च्या मध्यवर्ती कार्यालयाने दिली आहे. अस्तित्व कंपनीला त्याबाबतचा ठेका देण्यात आला असून या कंपनीकडून 50 चालक रत्नागिरी विभागात पुरवले जाणार आहेत.
नव्याने दाखल होणार्या कंत्राटी चालकांना रत्नागिरी आगारासह लांजा आणि गुहागर याठिकाणी नियुक्ती दिली जाणार आहे. या कंत्राटी चालकांच्या मदतीने एस.टी.ची गाडी रस्त्यावर आणण्याचा प्रयत्न विभागीय कार्यालयामार्फत केला जाणार आहे.