रत्नागिरी:- रत्नागिरी एसटी महामंडळाला यंदा गणपती पावला. दोन वर्षांच्या कोरोना काळातील बंद झालेली एसटीची सार्वजनिक वाहतूक आणि त्यानंतरच्या एसटी कर्मचाऱ्याच्या ५ महिन्याच्या संपातून सावरत यंदाच्या गणेशोत्सवाला एसटीला सुमारे ५ कोटी ३५ लाखाचे उत्पन्न मिळाले आहे. एसटी कर्मचाऱ्यांचा बंदचा मोठा फटका महामंडळाला बसला आहे. एसटीचे नियमित असलेल्या प्रवाशांनी त्या काळात अन्य पर्याय निवडल्याने एसटीचे हे २० टक्के प्रवासी कायमचे तुटल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे.
कोरोना काळातील दोन गणेशोत्सव अनेक निर्बंधांमध्ये झाले. या काळात गणेशभक्तांची घोर निराशा झाली. अन्य जिल्ह्यात किंवा अन्य ठिकाणी जाण्यास बंदी असल्याने आणि कोरोना चाचणी सक्तीची केल्याने सर्व सण दोन वर्ष ठप्प होते. संसर्ग रोखण्यासाठी शक्य तेवढे उपाय शासन आणि प्रशासन करत होते. या काळात एसटीची सार्वजनिक वाहतूकही बंद करण्यात आली. कोरोनापूर्वी एसटीला सुमारे साडेतीन हजार फेऱ्यातून दरदिवसाची सुमारे सव्वादोन लाख प्रवासी वाहतूक होती. ही सर्व वाहतूक तेव्हा बंद झाली. संसर्ग कमी झाल्याने हळुहळू निर्बंध उठवण्यात आले. एसटीने टप्प्याटप्प्याने फेऱ्या सुरू केल्या. एसटी ही ग्रामीण जनतेची ही जीवनवाहिनी मानली जाते. अल्पावधीत एसटीला चांगले भारमान मिळू लागले. एसटीने सावरण्यास सुरवात केली; परंतु यामध्ये एसटी कर्मचाऱ्यांचा चिघळलेल्या बंदमुळे एसटी पुरती कोलमडून गेली. एसटीच्या विलिनीकरणासाठी हा बंद एक दोन दिवस नाही तर तब्बल ५ महिने चालला. या काळात एसटीशी जोडले गेलेल्या शेकडो प्रवाशांनी वडाप किंवा अन्य पर्याय निवडला. हे सर्व प्रवासी मासिक पास, कामासाठी नियमित जाणारे होते. याचे प्रमाण थोडे थोडके नाही तर २० टक्के आहे. हे २० टक्के प्रवाशी एसटीपासून कामयचे तुटले आहेत.
एसटीला मोठा हात दिला तो यंदाच्या गणेशोत्सवाने. दोन वर्षानंतर गणेशभक्त गणेशाची प्रतिष्ठापना करण्यासाठी गावाकडे येणार होते. त्यामुळे एसटीने त्याचे योग्य नियोजन केले. गणेश चतुर्थीपूर्वी एसटीच्या १ हजार ५८० फेऱ्या सुरू होत्या. ६ लाख २१ हजार किमीच्या या फेऱ्या झाल्या. ७५ हजार प्रवासी एसटीने जिल्ह्यात आणले. यातून २ कोटी ६० लाखाचे उत्पन्न एसटीला मिळाले तर चाकरमान्यांच्या परतीच्या प्रवासासाठी १ हजार ८०० फेऱ्या सोडण्यात आल्या. सव्वासहा लाख किमीच्या फेऱ्या झाल्या. ८० हजार चाकरमान्यांची वाहतूक एसटीने केली. यातून २ कोटी ७५ लाख एवढे उत्पन्न मिळाले. यंदाच्या गणेशोत्सवात एसटीला ५ कोटी ३५ लाखाचे उत्पन्न मिळाल्याने एसटीला सावरण्यास मोठी मदत झाली.