एसटीपुढे प्रवासी भारमानाचे नवे संकट

निम्म्या बसेस रस्त्यावर ; ३ महिन्यात पावणेदोन कोटी तोटा

रत्नागिरी:- एसटी महामंडळापुढे आता नवीन संकट उभे राहिले आहे. राज्य परिवहन महामंडळाचे शासनामध्ये विलिनीकरण या मुद्द्यांवर गेले सव्वातीन महिने एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. या मागणीवर कर्मचारी ठाम असल्याने बंद मागे घेण्याची शक्यता कमी झाली आहे. महामंडळाने कारवाईचा बडगा उगारल्यानंतर काही कर्मचारी हजर झाले. त्यामुळे जिल्ह्यात एसटीच्या निम्म्या फेऱ्या सुरू झाल्या आहेत; मात्र त्याला प्रवासी भारमान मिळत नसल्याने एसटीची परिस्थिती आगीतून फुफाट्यात पडल्यासारखी झाली आहे. एसटीची आर्थिक गणिते बिघडली असून गेल्या सव्वातीन महिन्यात पावणेदोन कोटींचे नुकसान सोसावे लागले आहे.

राज्य परिवहन महामंडळाने कर्मचारी हजर होत नसल्याने कारवाई केल्यानंतर काही चालक, वाहक हजर झाले आहेत. तरी त्याचे प्रमाण अत्यल्प आहे. चालक, वाहकांच्या उपस्थितीवर एसटी फेऱ्यांची संख्या अवलंबून आहे. रत्नागिरी विभागातील एकूण नऊ आगारातून ४ हजार ५०० फेऱ्यामुळे पन्नास लाखाचे उत्पन्न प्राप्त होते; मात्र गेले दोन महिने दहा ते १३ लाख रुपयांचे उत्पन्न मिळत असून, यापूर्वीचे दोन महिने उत्पन्नाचे प्रमाण अत्यल्प होते. गेल्या चार महिन्यात दीड ते पावणेदोन कोटीचा आर्थिक भुर्दंड एसटी विभागाला सोसावा लागला आहे. महामंडळाने कंत्राटी चालक, वाहक नियुक्तीचा निर्णय घेतला असून, मंगळवारच्या सुनावणीकडे सर्वांचे लक्ष वेधले आहे; मात्र ही सुनावणी आता पुढे गेली आहे; मात्र कर्मचारी विलिनीकरणावर ठाम आहेत. गेल्या सव्वातीन महिन्यामध्ये ग्रामीण भागापासून शहरांमध्ये प्रवाशांनी पर्याय शोधले आहेत. त्यात प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी खासगी वाहनांना वाहतुकीला परवानगी दिल्याने एसटीकडे प्रवाशांनी पाठ केल्याचे दिसत आहे.

एसटी महामंडळाने उपलब्ध चालक, वाहकांच्या मदतीने जिल्ह्यातील निम्म्या फेऱ्या सुरू केल्या आहेत; मात्र त्याला प्रवासी भारमान मिळत नसल्याने एसटीच्या पुढे नवे संकट उभा राहिले आहे. अवैध प्रवासी वाहतूक आणि आलिशान खासगी ट्रॅव्हल्समुळे तोट्यात असलेल्या एसटीने अनेक उपाययोजना करून प्रवाशांना आपल्याकडे वळवण्याचा प्रयत्न केले आहेत. त्यामुळे काही प्रमाणात प्रवासीवर्ग टिकून होता. एसटीच्या बंदमुळे उरल्यासुरल्या प्रवाशांनी एसटीकडे पाठ केल्याचे दिसत आहे. त्यामुळे गेल्या तीन महिन्यांमध्ये पावणेदोन कोटी रुपयाचा एसटीला फटका बसला आहे.