रत्नागिरी:- एसटी महामंडळातर्फे राज्यात माल वाहतूक सुरू आहे पण यात कर्मचार्यांना अनेक समस्या भेडसावत आहेत. वाहनाची क्षमता व एकटा चालक असल्याने अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. तसेच ड्यूटी चार ते आठ दिवसापर्यंत करावी लागते. या काळात त्यांच्या राहण्या-जेवण्याची सोय प्रशासनाने करणे आवश्यक आहे. चालकांच्या समस्यांबाबत मान्यताप्राप्त महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेने ऑगस्ट महिन्यात तक्रार करूनही अद्याप कोणतीही उपाययोजना करण्यात आलेली नाही. याबात पुन्हा एकदा संघटनेचे अध्यक्ष संदीप शिंदे, जनरल सेक्रेटरी हनुमंत ताटे यांनी मंत्र्यांकडे निवेदन दिले आहे.
माल वाहतूक करण्यासाठी वापरण्यात येणारा ट्रक हा प्रवासी वाहतूक करण्यासाठी बांधण्यात आलेल्या बसेसचे परिवर्तन करून वापर करण्यात येत आहे. या बसेसची क्षमता व मालवाहतूक ट्रकच्या क्षमतेकडे दुर्लक्ष केले जात असल्याने चालकांना प्रवासात समस्या निर्माण होत आहेत. या चालकासोबत एक अतिरिक्त चालक किंवा सहाय्यक देण्यात यावा म्हणजे माल वाहतुकीचा ट्रक मागे पुढे करताना, लोडिंग वा अनलोडिंग करताना अडचणी येणार नाहीत. मार्गावर धावताना टायर पंक्चर वा इतर बिघाडाच्यावेळी येणार्या समस्या दूर होतील.
मालवाहतूक घेऊन मुक्कामाच्या ठिकाणी पोहोचल्यानंतर चालकांना इतरत्र मालवाहतुकीसाठी पाठविले जाते. त्यात चार ते आठ दिवसांचा काळ जातो व या काळात चालकाची राहण्या-जेवणाची व वाहनातच झोपण्याची सोय प्रशासनाने करणे आवश्यक आहे. काही ठिकाणी माल वाहतुकीसाठी माल मिळेपर्यंत चालकांना थांबावे लागते.