एमआयडीसीत दुचाकीमध्ये धडक; तिघे जखमी

रत्नागिरी:- शहरातील एमआयडीसी येथील फिनोलेक्स कॉलेज ते गद्रे कंपनीच्या वळणावर दुचाकी निष्काळजीपणे चालवून दुसऱ्या दुचाकीला मागून धडक दिली. या अपघातात तिघे जखमी झाले. ग्रामीण पोलिस ठाण्यात संशयित स्वाराविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सौरभ दत्तात्रय जाधव (रा. तळेगांव दाभाडे, दाभाडेआळी, ता. मावळ, जि. पुणे) असे संशयित स्वाराचे नाव आहे. ही घटना मंगळवारी (ता. ४) दुपारी पावणेचारच्या सुमारास फिनोलेक्स कंपनीकडून येणाऱ्या रस्त्यावर गद्रे कंपनीच्या वळणावर घडली.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार खबर देणार गुरुप्रसाद दिलीप लिंगायत (रा. प्रथमेश अपार्टमेंट, बसस्थानक समोर, रत्नागिरी) हे दुचाकी (क्र. एमएच-०८ बीबी ५७४५) सोबत राधा सुबोध अणेराव हिला घेऊन फिनोलेक्स कॉलेज ते कोकणनगर असे जात असताना संशयित स्वार सौरभ जाधव हे दुचाकी (क्र. एमएच-१४ जेक्यु ८००७) वरुन गद्रे कमपनी तिठा येथे आले असता दुचाकी निष्काळजीपणे चालवून पुढे जाणाऱ्या गुरुप्रसाद लिंगायत यांच्या दुचाकीला धडक दिली. या अपघातामध्ये गुरुप्रसाद व मागे बसलेली मुलगी राधा अणेराव (रा. सिद्धकला गर्ल्स हॉस्टेल नाचणे, रत्नागिरी) हे जखमी झाले. तसेच स्वतः स्वार सौरभ जाधव हा देखील जखमी झाला. या अपघात प्रकरणी पोलिस हेड कॉन्स्टेबल रुपेश भिसे यांनी ग्रामीण पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरुन पोलिसांनी संशयित स्वाराविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.