रत्नागिरी:- कोरोनाची दुसरी लाट संपुर्ण महाराष्ट्रात असून त्याचा प्रभाव रत्नागिरी जिल्ह्यातही सुरु आहे. मार्च महिन्यात 1 हजार 55 कोरोना बाधित आढळून आले. गतवर्षी ऑगस्ट, सप्टेंबर या महिन्यात अशी परिस्थिती निर्माण झाली होती. सणासुदीनिमित्त मार्चमध्ये रत्नागिरीत येणार्यांची संख्या वाढल्याचा हा परिणाम असल्याचा अंदाज आरोग्य यंत्रणेकडून वर्तविण्यात आला आहे.
फेब्रुवारी महिन्याअखेरपर्यंत जिल्ह्यात एकुण कोरोना बाधित सापडलेल्यांची संख्या 9 हजार 991 पर्यंत पोचली होती. सप्टेंबर 2020 नंतर संपूर्ण देशभरातच कोरोनाची पहिली लाट ओसरु लागली. त्याचा परिणाम कोकणातील जिल्ह्यातही दिसू लागला. रत्नागिरी जिल्ह्यात रुग्ण सापडण्याचे प्रमाणही पुढे अत्यल्प होते. फेब्रुवारी महिन्याच्या अखेरीस दुसर्या लाटेची शक्यता निर्माण झाली होती. त्यादृष्टीने राज्य शासनाकडून जनतेला कोरोना निकष पाळण्याचे आवाहन करण्यास सुरवात झाली होती. या काळात फेब्रुवारी महिन्यात सापडलेल्या रुग्णांचा आकडा कमी होता; परंतु मार्च महिन्यात कोरोना रुग्ण सापडण्याची संख्या वाढू लागली. 1 मार्चला 17 रुग्ण संख्या होती. पहिल्या आठ दिवसात 144, दुसर्या आठ दिवसात 134, तिसर्या आठ दिवसात 239 तर चौथ्या आठ दिवसांमध्ये 538 कोरोना बाधित आढळून आले. मार्चच्या शेवटच्या टप्प्यातील रुग्णांची संख्या सर्वाधिक आहे. याच कालावधी शिमगोत्सवाचे ढोल वाजू लागले होते. शिमग्यासाठी चाकरमानी मोठ्या प्रमाणात कोकणात दाखल होता. एसटी, रेल्वे धावण्याची संख्या कमी असली तरीही अनेकांनी खासगी गाड्यांनी गावी येणे पसंत केले होते. याच काळात मुंबईतील रुग्णांच्या संख्येत मोठ्याप्रमाणात वाढ होत होती. त्यामुळे मुंबईतून आलेले काही चाकरमानी वाहक ठरल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. सण असल्यामुळे एकमेकांशी असलेला संपर्कही वाढला आहे. या कालावधीत ग्रामीण भागात सापडणार्यांचे प्रमाण सर्वाधिक आहे. पुर्वी शहरी भागांमध्येचे रुग्ण आढळत होते होते. मार्च महिन्यापर्यंत जिल्ह्यातील एकुण रुग्णसंख्या 11 हजार 029 होती. एप्रिलच्या सुरवातीच्या तिन दिवसातही मोठ्याप्रमाणात प्रमाणात रुग्ण सापडलेले आहेत.