रत्नागिरी:- रनपतील तीन नगरसेवकांचा शहरात भलताच बोलबाला सुरु झाला आहे. एका नगरसेवकाने १ किलो चांदीच्या विटेची मागणी करत गोळ्या घालण्याची धमकी दिली तर दुसर्या दोघांनी बिल्डरसोबत वाद घातल्याने सारा प्रकार पोलीस स्थानकात गेला आहे. तिघा नगरसेवकांच्या कारनाम्याची चर्चा शहरात सुरू आहे.
कोरोनानंतर आता हळूहळू व्यवसाय सुरु झाले असताना अनेक व्यावसायिकांना भलत्याच मागणीचा त्रास सुरु झाला आहे. यापूर्वी खंडणीसारखे प्रकार आपण शहरात ऐकले होते. पोलिसांनी खंडणी बहाद्दरांना वेळीच ठेचल्याने ते प्रकार पूर्णपणे थांबले. आता पुन्हा असे प्रकार उघड होऊ लागले आहेत.
शहरातील गजबजलेल्या राम आळी परिसरात असलेल्या एका ज्वेलर्सला मोबाईलवरुन फोन करुन धमकावण्याचा प्रकार उघडकीस आला आहे. धमकावणारी व्यक्ती ही नगरसेवक असल्याची माहिती देखील पुढे आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार एका नगरसेवकाने त्या ज्वेलर्सला कॉल करुन तब्बल १ किलो चांदीच्या विटेची मागणी केली. ही मागणी होताच दुकानदाराने १ किलो चांदीची किंमत सांगून त्याचे पैसे द्या असे सांगितल्याने नगरसेवकाचा पारा चढला होता. ही घटना १४-९-२०२१ रोजी दुपारी २.१५ च्या सुमारास घडली.
सुवर्णकाराने पैसे मागितल्याने पित्त खवळलेल्या नगरसेवकाने १६ सप्टेंबर रोजी पुन्हा कॉल केला, मात्र हा कॉल रात्री १०.५० वा. च्या सुमारास केला. यावेळी पुन्हा त्याच्याकडे १ किलो चांदीच्या विटेची मागणी केली,न दिल्यास गोळ्या घालून मारण्याची धमकी तसेच शिवीगाळ केली.
याबाबत त्या सुवर्णकाराने थेट पोलीस स्थानक गाठले व घडल्या प्रकाराची माहिती पोलिसांना दिली. त्याबाबतचा लेखी तक्रार अर्ज देखील सुवर्णकाराने शहर पोलीस स्थानकात दिला आहे. त्यानुसार पोलिसांनी भा. दं. वि. क. ५०४, ५०६ अन्वये एन. सी. दाखल केली आहे.
दुसरा प्रकार विठ्ठल मंदिर परिसरात नगरसेवक विरुद्ध बांधकाम व्यावसायिक यांच्यात घडला आहे. विठ्ठल मंदिर समोर एका बिल्डरचे बांधकाम सुरु आहे, यावरुन तेथील नगरसेवक बंधूंनी त्यावर आक्षेप घेतला. बांधकामाच्या ठिकाणी टाकलेल्या डिपीबाबत हा आक्षेप होता. हा वाद विकोपाला जाऊन संबंधित ठेकेदार व नगरसेवक यांनी परस्परांविरुद्ध शहर पोलीस स्थानकात तक्रार अर्ज दिले. या अर्जावरुन पोलिसांनी नगरसेवक आणि संबंधित बिल्डर यांना १४९ नुसार नोटीसा बजावल्या आहेत.