रत्नागिरी:- शहरातील एकादशीच्या जत्रेत सापडलेल्या भुरट्या चोरांच्या विरोधात शहर पोलिसांनी न्यायालयात तत्काळ दोषारोप सादर केले. न्यायालयानेही या खटल्याची तत्काळ सुनावणी घेत गुन्हा दाखल झाल्यानंतर अवघ्या पाच दिवंगत चोरट्याने शिक्षा सुद्धा सुनावली. यातील दोन तरुणांना न्यायालयाने मंगळवारी प्रत्येकी 7 दिवस सश्रम कारावास आणि 500 रुपये दंडाची शिक्षा सुनावली.
कैलास राहूल खाडे (23) आणि अमोल विजय दगडे (19, ऱा दोन्ही पिंपरी-चिंचवड,पुणे) अशी शिक्षा सुनावण्यात आलेल्या दोन्ही आरोपींची नावे आहेत. कार्तिकी एकादशीनिमित्त रत्नागिरीत दिवसभर जत्रेत गर्दी उसळते. या गर्दीचा फायदा घेऊन चोर्या होऊ शकतात याचा विचार करून पोलिस जत्रेत लक्ष ठेवून होते. तेव्हा शुक्रवारी रात्रीच्या सुमारास जत्रेच्या वेळी यातील कैलास खाडे हा पटवर्धन हायस्कुल समोरील बोळात आणि अमोल विजय दगडे हा एसटी स्टँड समोरील बेंजामिन एन्क्लेव येथे अंधारात आपली ओळख लपवून चोरी करण्याच्या इराद्याने बसले होते. पोलिसांनी त्यांची चौकशी केली असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यामुळे पोलिसांचा त्यांच्यावर संशय बळावल्याने दोघांनाही अटक करण्यात आली होती.
त्यांच्यावर महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 122 (क )नुसार गुन्हा दाखल करुन न्यायालयात दोषारोपत्र दाखल करण्यात आले होते.मंगळवारी या दोघांनाही सह दिवाणी न्यायाधीश एम.आर.सातव यांनी 7 दिवस सश्रम कारावास आणि 500 रुपये दंड तो न भरल्यास 3 दिवस साधा कारावासाची शिक्षा सुनावली.या खटल्यात सरकारी पक्षातर्फे अॅड.प्रज्ञा तिवरेकर यांनी तर पैरवी अधिकारी म्हणून पोलिस हेड काँस्टेबल दुर्वास सावंत आणि प्रिया लिंगायत यांनी काम पाहिले.