रत्नागिरी:- एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान २०२३-२४ साठी रत्नागिरी जिल्हयाला ४ कोटी ३८ लाखाचा निधी मंजुर करण्यात आला आहे. फळपिके, फूलझाडे, शेतीला पूरक यंत्र यासह मधुमक्षिका पालन, ड्रॅगन फ्रुटच्या लागवडीला प्रोत्साहन देण्यात आले आहे.
रत्नागिरी फलोत्पादन जिल्हा म्हणून ओळखला जातो. त्यासाठी विविध लागवडीला प्रोत्साहन दिले जाते. या योजनेत उच्च तंत्रज्ञानावर आधारीत रोपवाटीका, क्षेत्रविस्तार, पुष्पोपादन, फळपिके, मसाला पिके, अळिंबी उत्पादन, जुन्या फळबागांचे पुनरूज्जीवन, सामुहिक शेततळे, शेततळे अस्तरीकरण, नियंत्रित शेती, फलोत्पादन यांत्रिकीकरण, मुनष्यबळ विकास कार्यक्रम, काढणीत्तोर व्यवस्थापन आणि पणन सुविधा आदिंना चालना देण्यात आली आहे. या वर्षी प्रामुख्याने मधुमक्षिका पालनाला तरतुद केली आहे. क्षेत्रविस्तार घटकांतर्गत ड्रॅगन फ्रुट साठी १ लाख ८२ हजार, पुष्पोत्पादनासाठी १६ हजार, मसाला पिकांच्या (हळद, काळीमिरी, मिरची) लागवडीसाठी ४ लाख 4 हजार, अळंबी उत्पादन प्रकल्पासाठी ८ लाख, जुन्या फळबागांचे पुनरूज्जीवन-आंबा १६ लाख, सामुहीक शेततळ्यासाठी १३ लाख ६७ हजार, शेततळे अस्तरीकरणासाठी ४ लाख ५० हजार, नियंत्रित शेती – हरीतगृह, शेडनेटगृह, प्लॅस्टिक मल्चींग साठी ११ लाख २० हजार, मधुमक्षिका पालनासाठी ९५ हजार, फलोत्पादन यांत्रिकीकरणासाठी ५१ लाख ५० हजार एवढी तरतुद आहे. या योजनेत ट्रॅक्टर, पॉवर टिलर, पिक संरक्षण उपकरणांचा समावेश आहे. शेतकरी प्रशिक्षण शेतकरी प्रक्षेत्र भेट प्रशिक्षणासाठी १० लाख रूपये ठेवण्यात आले आहेत. जिल्हयाच्या दृष्टीने महत्वाची व सर्वाधिक मागणी असलेल्या पॅक हाऊस, रेफर व्हॅन, रायपनिंग चेंबर, प्राथमिक प्रक्रिया केंद्र आदि घटकांसाठी २ कोटी ९६ लाख ४० हजार इतकी भरीव तरतुद केली आहे. फिरते विक्री केंद्रासाठी ७५ हजार अशी एकुण ४ कोटी ३८ लाख १० हजार मंजुर करण्यात आलेली आहे.
महाडीबीटी अर्ज करणे आवश्यक
या योजनेमध्ये सहभागी घेण्यासाठी जिल्हयातील शेतकऱ्यांनी महाडीबीटी आज्ञावलीवर अर्ज करणे आवश्यक आहे. यासाठी जवळच्या आपले सरकार ई-सेवा केंद्रामधे जाऊन किंवा https://mahadbtmahait.gov.in या आज्ञावलीवर देखील अर्ज करता येऊ शकेल. जिल्हयातील जास्तीतजास्त शेतकऱ्यांनी फलोत्पादनाशी निगडीत योजनांचा लाभ घेणे आवश्यक आहे. योजनेच्या अधिक माहितीसाठी गावपातळीवरील कृषि सहाय्यक, कृषि पर्यवेक्षक, तालुका कृषि अधिकारी, जिल्हास्तरावर जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात येत आहे.