मुंबई:– शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे हे राज्याचे नवे मुख्यमंत्री होणार आहेत. भाजपचे नेते व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेत ही घोषणा केली आहे. शिंदेंना भाजप, शिवसेनेचे बंडखोर आमदार, अपक्ष आमदार व छोटे पक्ष यांचा पाठिंबा आहे. ते एकटेच मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. भाजप सत्तेत राहणार असले, तरी या सरकारमध्ये देवेंद्र फडणवीस हे सहभागी होणार नाहीत.
एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केल्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना राजीनामा द्यावा लागला. शिंदे हे गोवा येथून गुरुवारी मुंबईला आले. त्यांनी भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. त्यानंतर राज्यपालांची भेट घेऊन एकनाथ शिंदे व देवेंद्र फडणवीस यांनी संयुक्तपणे पत्रकार परिषद घेतली. शिंदे आज सात वाजता शपथ घेणार आहेत.
पत्रकार परिषदेत फडणवीस म्हणाले, शिवसेना, भाजप हे एकत्र लढले पण शिवसेनेने वेगळा निर्णय घेतला. बाळासाहेब ठाकरे यांनी ज्यांना विरोध केला. त्यांच्याबरोबर शिवसेना गेले. महाविकास आघाडी सरकारमध्ये प्रचंड भ्रष्टाचार झाला.
महाराष्ट्राच्या इतिहासात दोन मंत्री भ्रष्टाचारामुळे जेलमध्ये गेले. मनी लॉड्रिंग झाले. ही खेदजनक बाब आहे. एकनाथ शिंदे हे शिवसेनेचे गटनेते आहेत. शिवसेनेच्या आमदारांची कुंचबना झाली आहे. रोज अपमान झाला आहे.
शिवसेनेचा विधिमंडळ गट, भाजप विधिमंडळ गट, सोळा अपक्ष आमदार सोबत आलेला आहेत. या सगळ्यांचे पत्र राज्यपालांना दिले आहेत. ही तत्त्वाची लढाई, हिंदुत्वाची लढाई आहे. एकनाथ शिंदे यांना भाजपचे समर्थन असल्याचे फडणवीस यांनी म्हटले आहे.