‘एकच मिशन, जुनी पेन्शन’, जिल्ह्यातील हजारो कर्मचारी संपात सहभागी

सरकारी कामकाज ठप्प; संपाचा जनसामान्यांना फटका

रत्नागिरी:- एकच मिशन जुनी पेन्शन, कोण म्हणतं देणार नाही, घेतल्याशिवाय राहणार नाही, अशा घोषणा देत आज बेमुदत संपाच्या पहिल्याच दिवशी जिल्ह्यातील सुमारे १५ ते २० हजार कर्मचारी संपात सामिल झाले. संपाचा शासकीय कामावर याचा मोठा परिणाम होऊन ती ठप्प झाली. जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद आदी कार्यालयामध्ये पूर्णतः शुकशुकाट होता. जिल्हाधिकारी कार्यालयातील काही भागात बंद ठेवण्यात आला होता. ग्रामीण भागातून कामानिमित्त आलेल्या अनेक नागरिकांना रिकाम्या पावलांनी परत जावे लागले. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर काही काळ वाहतूककोंडी झाली; परंतु पोलिसांनी त्यावर नियंत्रण मिळवले आणि वाहतूककोंडी सोडवली.

सर्वांना सरसकट जुनी पेन्शन योजना लागू करा या प्रमुख मागण्यांसह अन्य मागण्यांसाठी जिल्ह्यातील सर्व शासकीय, निमसरकारी कर्मचारी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी तसेच अन्य क्षेत्रातील २० हजार कर्मचारी जिल्हाभरात राज्यव्यापी संपामध्ये सहभागी झाले. सकाळी 11 वा. जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर हळुहळू शासकीय कर्मचाऱी गोळा होत गेले. 12 वाजेपर्यंत ही संख्या काही हजारात गेली. मोठ्या संख्येने कर्मचारी संपात उतरल्याने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मोठी गर्दी झाली. एकच मिशन जुनी पेन्शन, असा स्लोगन असलेले टी शर्ट, टोप्या घालून कर्मचारी संपात सामिल झाले. जुनी पेन्शन लागू करण्यात यावे या प्रमुख मागण्यांसाठी आजपासून हे कर्मचारी बेमुदत संपात तरले आहेत.

विविध संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी २००५ मध्ये बंद झालेली ही जुनी पेन्शन लागू करण्याबाबत आपली मते व्यक्त केली. गर्दी वाढल्याने वाहतूककोंडी होऊ लागली. अखेर वाहतूक पोलिस, शहर पोलिस आणि स्वयंसेवक यांनी संपकऱ्यांना एका बाजूला करून वाहतूककोंडी सोडवली. संप यशस्वी करण्यासाठी सर्व संघटनेच्या समन्वयकांची यापूर्वीच बैठक झाली. नियोजनानुसार आजचा संप संघटनांनी शंभर टक्के यशस्वी केला. त्याचप्रमाणे प्रत्येक तालुक्यातील सर्व कर्मचाऱ्यांनी तहसीलदार कार्यालयासमोर गोळा होऊन संपात समिल झाले.

जिल्हाधिकारी कार्यालयातील प्रथम आणि द्वितीय श्रेणीतील अधिकारी सोडले तर सर्व कर्मचारी या संपात उतरले होते. सामान्य प्रशासन, जिल्हा पुरवठा, चिटणीस शाखा, पालिका विभाग आदी विभाग रिकामे होते. जिल्हा परिषदेमध्येही तीच अवस्था होती. सर्व कार्यालयांमध्ये शुकशुकाट होता. शासकीय कामकाज आज पूर्णतः ठप्प होते. कामानिमित्त आलेल्या अनेक नागरिकांना रिकाम्या हाती परतावे लागले.
संपकाळामध्ये अत्यावश्यक सेवा सुरू राहावी यासाठी प्रशासनाने नियोजन केले आहे. जिल्हा पोलिस दल आणि होमगार्डची त्यासाठी मदत घेतली जाणार आहे.