रत्नागिरी:- कोणीही येवो आपल्याला लढायचं आहे, आणि प्रचंड मताधिक्याने जिंकायचं आहे या आत्मविश्वासाने आम्ही कामाला लागलो आहोत, समोर कोण असेल याची मी अजिबात चिंता करीत नाही. कोणत्याही परिस्थितीत अडीच लाखांच्या मताधिक्याने आपला विजय होईल, असा दावा खासदार तथा उबाठाचे रत्नागिरी-सिंधुदुर्गमधील उमेदवार श्री. विनायक राऊत यांनी केला आहे. तर दि.16 एप्रिलला आपण महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याची घोषणा खा.राऊत यांनी केली.
दिवसभरात किमान 20 बैठका मी घेत असतो. दि.16 एप्रिल रोजी मी उमेदवारी अर्ज भरणार आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची सभा दि. 28 एप्रिल रत्नागिरी, दि.30 एप्रिलला कणकवलीत सभा होईल, तर आदित्य ठाकरे यांची रत्नागिरी आणि सावंतवाडीत सभा होईल असे त्यांनी सांगितले.
रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभेची ही जागा नैसर्गिक न्यायतत्वावर भाजपची आहे. ना.नारायण राणे हे हेवीवेटेड नेते आहेत, ते रणांगणात येतील अशी अपेक्षा करूया असे खा.राऊत यावेळी सांगितले.
वंचित बहुजन आघाडीबाबत राऊत म्हणाले की, पहिल्या 3 नंतर 4 आणि शेवटी 5 जागांचा प्रस्ताव वंचितला देण्यात आला होता, रामटेकची जागा सुद्धा वंचितला देऊ केली होती. 5 जागा प्रकाश आंबेडकर यांनी आनंदाने स्विकारायला हव्या होत्या, पण त्यांनी ती संधी गमावली आहे याबाबत दुःख आहे, पण आंबेडकर यांच्याबाबत अजून आशावादी आहोत असं खासदार राऊत यावेळी म्हणाले.
उमेदवार कोणीही असला तरी आपला प्रतिस्पर्धी आहे हे समजून आम्ही कामाला लागतो. केंद्रीय यंत्रणा ज्यांच्याकडे आहेत ते असे परिपूर्ण सर्व्हे करतात. केवळ मोर नाचतो म्हणून तुडतुडे नाचतो अशी अवस्था शिंदे गटाची आहे अशी टीका यावेळी खासदार राऊत यांनी भाजप आणि शिंदे गटावर केली.
येत्या काही दिवसांत शिंदे गट, अजित पवार गटाचं विसर्जन होणार म्हणजे होणारच आहे, शिंदे गटाचे खासदार आता भाजपवर बोलायला लागले आहेत. भाजपने या गद्दारांना गरजेपुरतं जमा केलेलं आहे अशी देखील टीका यावेळी खा. राऊत यांनी केली.