रत्नागिरी:- शिवसेना उबाठाच्या तालुकाप्रमुखपदी धडाडीचे उपजिल्हाप्रमुख शेखर घोसाळे यांची निवड झाल्यानंतर बुधवारी शहरातील शिवसेना शाखा क्रमांक 1 साळवी स्टॉप येथे जोरदार स्वागत करण्यात आले. यावेळी उबाठाच्या कार्यकर्ते व पदाधिकार्यांनी फटाक्यांची आतषबाजी करीत जोरदार घोषणाबाजी केली.
उबाठाचे माजी तालुकाप्रमुख बंड्या साळवी यांनी राजिनामा देत, पालकमंत्री उदय सामंत यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर उबाठा तालुकाप्रमुख पद रिक्त झाले होते. याठिकाणी चार पदाधिकारी इच्छूक होते. मात्र उपजिल्हाप्रमुख म्हणून चांगली कामगिरी करणारे व शिवसेना ठाकरे गटाचे एकनिष्ठ शिलेदार शेखर घोसाळे यांच्यावर पक्षनेतृत्वाने जबाबदारी टाकली. उबाठाचे सचिव माजी खासदार विनायक राऊत यांचे विश्वासू म्हणून ओळख असणारे शेखर घोसाळे यांना त्यांच्या एकनिष्ठतेचे बक्षिस देण्यात आले आहे. कुणालाही अंगावर घेण्याची ताकद असणारे अशी ओळख असणार्या शेखर घोसाळे यांच्या निवडीमुळे मागील काही दिवसांपासून शिवसेना उबाठामध्ये आलेली मरगळ दूर झाली आहे. शिवसेना उबाठाच्या पदाधिकार्यांनी मनापासून त्यांच्या निवडीचे स्वागत केले.
निवड जाहीर झाल्यानंतर प्रथमच त्यांचे स्वागत शिवसेनेच्या साळवी स्टॉप येथील रत्नागिरी शाखेत करण्यात आले. यावेळी माजी आमदार बाळ माने, उदय बने, शहरप्रमुख प्रशांत साळुंखे, युवा तालुकाप्रमुख व शहर संघटक प्रसाद सावंत, उपजिल्हाप्रमुख संजू साळवी, जिल्हा समन्वयक संजय पुनस्कर, अॅड. सुजित कीर, माजी तालुकाप्रमुख राजू शिंदे, सर्व विभागप्रमुख, महिला उपजिल्हा संघटक ममता जोशी, विधानसभा क्षेत्रसंघटक सायली पवार, माजी नगरसेविका शिवलकर यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.