रत्नागिरी:- मुंबई-गोवा महामार्ग चौपदरीकरणाच्या कामात अनेक अडथळ्यांपैकी मुख्य ठेकेदार आणि उपठेकेदारांमधील आर्थिक व्यवहार हे एक महत्वाचे कारण पुढे आले आहे. मुख्य ठेकेदार कंपनीने उपठेकेदार नेमून कामे करून घेतली. मात्र, झालेल्या कामाचे पैसे उपठेकेदाराला न मिळाल्याने उपठेकेदाराने पुढील कामे बंद ठेवली. या कारणातूनही रत्नागिरी-संगमेश्वरातील आरवली ते बावनदी टप्प्यातील कामाचा खोळंबा झाला.
आरवली ते बावनदी पर्यंतचे काम रखडले होते. ओझरखुर्द, गावमळा, आंबेड ते वांद्री मार्गावर काँक्रीटीकरण झाले असले तरी आंबेड ते कोळंबे दरम्यान खड्डेच खड्डे पडले होते. आंबेड, कोळंबे, कुरधुंडा आदी गावांमध्ये चौपदरीकरणातील आवश्यक कामे झालेलीच नाहीत.
आरवली ते बावनदीपर्यंतचे काम एका कंपनीला मिळाले. या कंपनीने उपठेकेदार नेमून काम करून घेतले. परंतु झालेल्या कामांचे पैसे उपठेकेदाराला न मिळाल्याने आर्थिक अडचणीत आलेल्या उपठेकेदाराकडून कामच बंद ठेवण्यात आले.
मुंबई-गोवा महामार्ग चौपदरीकरणाच्या कामात रत्नागिरी जिल्ह्यातील काम रखडण्यामागे अनेक कारणे आहेत. रस्ता वाढवताना डोंगर फोडावे लागतात. त्या डोंगरातील दगड फोडण्यात वेळ जातो. त्याचबरोबर जमिन अधिग्रहण सहहिस्सेदारांच्या अंतर्गत वादांमुळे वेळेत होत नाही. त्यात झालेल्या कामाची बिलांची रक्कम काम करणार्या ठेकेदाराला वेळेत मिळत नाही, हे सर्वात महत्त्वाचे कारण आहे.