उबाठातील माजी आमदार, जि.प. अध्यक्षाचा शिवसेनेत प्रवेश
रत्नागिरी:- विधानसभेत मिळालेल्या अभूतपूर्व यशानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे शनिवारी महाराष्ट्रातील जनतेचे आभार मानत असून, आभार यात्रेच्या निमित्ताने आज शनिवार दि.१५ रोजी ते रत्नागिरीत येत आहेत. याठिकाणी दुपारी १ वाजता होणार्या मेळाव्यात ते कुणाला लक्ष करणार याकडे शिवसैनिकांचे लक्ष लागून राहिले असून, या मेळाव्यात जिल्ह्यातील उबाठाचे व अन्य पक्षातील अनेक पदाधिकारी शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. या मेळाव्याच्या निमित्ताने ना. उदय सामंत मिशन टायगरच्या रुपात उबाठाला रत्नागिरी जिल्ह्यात जोरदार धक्का देणार आहेत. ना.शिंदे यांच्या सभेसाठी चंपक मैदान येथे भव्य मंडप उभारण्यात आला आहे.तर ५० हजार शिवसैनिकांची बसण्याची आसन व्यवस्था करण्यात आली आहे.
राज्यामध्ये महायुतीला मोठे यश विधानसभेला मिळाले. त्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जनतेचे आभार मानण्यासाठी आभार यात्रेला प्रारंभ केला आहे. रत्नागिरीत १५ फेब्रुवारी रोजी दुपारी १२ वाजता चंपक मैदान येथे आभार मेळावा होणार आहे. या निमित्ताने सामंत बंधू जोरदार शक्तीप्रदर्शन करणार आहेत. रत्नागिरी जिल्ह्यात सध्या ना. उदय सामंत व ना. योगेश कदम असे शिवसेनेचे दोन मंत्री आहेत. या आभार मेळाव्याच्या निमित्ताने जवळपास ५० हजारपेक्षा अधिक शिवसैनिक उपस्थित राहणार आहेत. त्यासाठी मंडणगडपासून राजापूरच्या टोकापर्यंत प्रत्येक जिल्हा परिषद गट, नगर परिषद यामधून प्रत्येकी एक हजार कार्यकर्ते यावेत अशी तयारी करण्यात आली आहे. प्रत्येक प्रमुख पदाधिकाऱ्यांवर जबाबदारी देण्यात आली आहे.
या मेळाव्यातच ना. उदय सामंत हे उबाठाला सुरुंग लावणार आहेत. यामध्ये अनेक प्रमुख पदाधिकारी शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. माजी आमदार सुभाष बने, माजी जि.प. अध्यक्ष रोहन बने यांच्यासह अनेक प्रमुख पदाधिकारी विभाग प्रमुख, शाखाप्रमुख शिवसेनेचे धनुष्यबाण हाती घेणार आहेत.या मेळाव्याच्या तयारीसाठी चंपक मैदान येथे भव्य मंडप उभारण्याचे काम हाती घेण्यात आले आहे.