उपप्रादेशिक परिवहन अधिकारीपदी सुबोध मेडसीकर यांची नियुक्ती

रत्नागिरीः– रत्नागिरी उपप्रादेशिक परिवहन अधिकारी म्हणून सुबोध मेडसीकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांनी आपल्या पदाचा कार्यभार स्विकारला आहे. सन १९८६ मध्ये परिवहन विभागात दाखल झालेल्या श्री.मेडसीकर यांनी तब्बल ३५ वर्षे राज्यातील विविध जिल्ह्यामध्ये सेवा बजावली आहे. 

परिवहन विभागात सहाय्यक मोटर वाहन निरीक्षक म्हणून सेवेत दाखल झाले. त्यानंतर सोलापूर, नांदेडसह अन्य जिल्ह्यामध्ये त्यांनी सेवा बजावली होती. सध्या पिंपरी चिंचवड येथे ते कार्यरत होते. बढतीने त्यांची बदली रत्नागिरी उपप्रादेशिक परिवहन अधिकारी म्हणून करण्यात आली आहे. परिवहन खात्यातील प्रदीर्घ अनुभवाचा फायदा जिल्ह्याला करुन देण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला आहे. लॉकडाऊननंतर विविध उपक्रम सुरू करण्यात येतील. नागरिकांसह वाहन चालकांचे सहकार्य घेतले जाणार आहे.विनोद चव्हाण यांची बदली झाल्यानंतर बरेच महिने रत्नागिरी आरटीओ पद रिक्त होते. श्री.मेडसीकर यांच्या नियुक्तीमुळे आरटीओ कार्यालयाला पूर्णवेळ अधिकारी मिळाले आहेत.