रत्नागिरी:- रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार शिवसेना उबाठाचे विनायक राऊत यांच्या प्रचारासाठी शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उध्दव ठाकरे रविवारी रत्नागिरीत येत असून, महाविकास आघाडीची जाहीर सभा घेणार आहेत. जलतरण तलाव शेजारील मैदानात होणार्या या सभेत भाजपाचे उमेदवार नारायण राणे आणि उद्योगमंत्री उदय सामंत यांच्याविरोधात ठाकरे काय बोलतात याकडे सर्वसामान्य शिवसैनिकांचे लक्ष लागून राहिले आहे.
रत्नागिरी सिंधुदूर्ग लोकसभा मतदार संघात महाविकास आघाडीकडून उबाठाचे खासदार विनायक राऊत हे निवडणुकीच्या रिंगणात आहेत.
महायुतीकडून भाजपाचे उमेदवार नारायण राणे यांच्या प्रचारासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची राजापूरमध्ये सभा झाली. त्यानंतर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची सिंधुदुर्गमध्ये तर देशाचे गृहमंत्री अमित शहा यांची रत्नागिरीत सभा होणार आहे. मात्र महाविकास आघाडीकडून शिवसेना उबाठाचे पक्षप्रमुख उध्दव ठाकरे हे रत्नागिरी आणि सिंधुदूर्गमध्ये सभा घेत आहेत.
शिवसेनेच्या फुटीनंतर उध्दव ठाकरे यांची व आदित्य ठाकरे यांची सभा रत्नागिरीत झाली होती. या सभेला उत्स्फुर्त पाठिंबा शिवसैनिकांचा मिळाला होता. शिवसेनेच्या फुटीनंतर प्रथमच होणार्या लोकसभा निवडणुकीत मतदार कुणाच्या बाजुने उभे राहतात हे स्पष्ट होणार आहे. माजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे हे कुणावर रविवारी शाब्दीक हल्ला चढवतात याकडे कोकणवासियांसह संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिले आहे. शहरातील साळवीस्टॉप येथील जलतरण शेजारील मैदानात महाविकास आघाडीची ही सभा सायंकाळी 6.30 वाजता होणार आहे. यावेळी महाविकास आघाडीचे रत्नागिरी-सिंधुदुर्गतील नेतेमंडळी उपस्थित राहणार आहेत.