उद्योजक किरण सामंत, माजी आ. प्रमोद जठार यांनी सिंधुरत्न योजनेच्या सदस्य पदावर निवड

रत्नागिरी:- सिंधुरत्न समृद्ध योजनेच्या कार्यकारी समितीवर उद्योजक आणि बाळासाहेब शिवसेना पक्षाचे नेते किरण ऊर्फ भैया सामंत आणि माजी आमदार प्रमोद जठार यांची नियुक्ती केली आहे. शिक्षणमंत्री तथा योजनेचे अध्यक्ष दीपक केसरकर यांनी ही नियुक्ती केली आहे.

रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या दोन जिल्ह्यांतील उपलब्ध नैसर्गिक साधनसंपत्ती व विकासक्षेत्रांची निवड करून त्या क्षेत्रांचा सूक्ष्म आराखडा तयार करणे व त्या आधारे परिणामकारक अंमलबजावणी करून पर्यावरणक्षम शाश्वत विकास घडवणे हा या योजनेचा उद्देश आहे. या दोन जिल्ह्यांतील तरुण उद्योजकांना स्थानिक स्तरावर नवीन उद्योगधंदे विकसित करण्यासाठी उपाययोजनांद्वारे प्रोत्साहान मिळणार आहे. जिल्ह्यातील अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती व दारिद्र्यरेषेखालील लाभार्थीसाठी व्यक्तिगत दरडोई उत्पन्न वाढीकरिता अतिरिक्त आर्थिक मदत उपलब्ध करण्याच्यादृष्टीने योजनेचा दोन्ही जिल्ह्यांना फायदा होणार आहे.

उद्योजक किरण सामंत यांना दूरदृष्टी आहे. पर्यटनासह उद्योग व्यवसायाला चालना देण्याच्या दृष्टीने त्यांच्या संकल्पनांचा निश्चित स्थानिकांना फायदा होणार आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या विकासामध्ये देखील प्रमोद जठार यांचेही योगदान आहे. या दोन्ही नेत्यांच्या नियुक्तीमुळे दोन्ही जिल्ह्यांच्या विकासाला नक्कीच फायदा होणार आहे.