रत्नागिरी:- रत्नागिरीचे आमदार, राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांना पोलिसांसमोरच जाळून मारण्याची धमकी दिली आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या राजापुरातल्या सभेमध्ये ही घटना घडली. रिफायनरीला विरोध करणाऱ्या एका कार्यकर्त्याने पटोले आणि पोलिसांसमोर ही धमकी दिली. धमकी दिलेल्या या नेत्याचे नाव नरेंद्र जोशी असल्याचे सांगितले जात आहे.
शिंदे सरकारमधील मंत्र्यांना धमकी दिल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. पोलिसांनी या प्रकरणाची चौकशी सुरू केली असून रत्नागिरी पोलीस अधिक्षक मोहीकुमार गर्ग यांनी उदय सामंत यांच्याशी याविषयी चर्चा केली आहे.
रिफायनरीचे विरोधक उदय सामंतांविरोधात आक्रमक झाले आहेत. रिफायनरी समर्थक आणि विरोधक यांनी राजापुरात नाना पटोले यांची भेट घेतली. यावेळी आपली भूमिका मांडत असताना रिफायनरी विरोधकांचा संताप अनावर झाला. त्यानंतर जोशी यांनी उदय सामंत यांना जाळून मारण्याची धमकी दिली. यावेळी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि पोलिसही उपस्थित होते.