रत्नागिरी:- मनसेच्या मेळाव्यात ना. नारायण राणे यांनी जोरदार फटकेबाजी करीत उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला. ते कोकणात काही द्यायला नाही तर आग लावायला आले आहेत, अशी टीका करीत त्यांच्या खासदाराला रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातील तालुके माहिती नाहीत तर फक्त पेटी वाजवता येते, अशी बोचरी टीका केली.
भाजपचे उमेदवार नारायण राणे यांच्यासाठी रत्नागिरीत मनसेच्यावतीने एका मेळाव्याचे आयोजन केले होते. या मेळाव्याला मनसेचे नेते नितीन सरदेसाई, प्रकाश महाजन, अविनाश जाधव, संदीप देशपांडे, वैभव खेडेकर आदी उपस्थित होते. यावेळी मनसे नेत्यांनी उद्धव ठाकरे यांच्या निशाणा साधला.
बाळासाहेबांनी स्वाभिमान शिकवला
यावेळी बोलताना ना. नारायण राणे म्हणाले की, आम्हाला स्वाभिमान हा बाळासाहेबांनी शिकवला. उद्धव ठाकरे हे स्वभावाने विकृत असून कोकणासाठी अडिच वर्षात काय केले ते आधी सांगा. अतिवृष्टीचे पैसे देऊ शकले नाहीत ते कोकणचा विकास काय करणार? असा सवालदेखील त्यांनी यावेळी केला.
ते पुढे म्हणाले की, मी पक्षाकडे उमेदवारी मागितली नाही तर पक्षाने मला उमेदवारी दिली. एमएसएनईचा मंत्री म्हणून मी देशभरात काम केले. माझ्या कामाचे कौतुक राष्ट्रपतींसह पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीदेखील केले.
मुख्यमंत्री असताना सारेच साहेब, साहेब करायचे. त्यावेळी मी सर्वांना सांगितले होते आणि आजही सांगतो, मी साहेब नाही तर सेवक आहे. एक वर्षात कोकणची रखडलेली विकासकामे मार्गी लावायची जबाबदारी माझी असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
राज ठाकरेंबाबत बोलताना त्यांनी स्तुतीसुमने उधळली. चांगल्याला चांगले म्हणणे ही माणुसकी केवळ राज ठाकरेंमध्ये आहे. नरेंद्र मोदी यांची ध्येयधोरणे राज ठाकरे यांना मान्य झाल्याने त्यांनी महायुतीला पाठिंबा दिला आहे. त्यांचे आणि माझे जिव्हाळ्याचे संबंध असल्याचेदेखील राणे यांनी सांगितले.
यावेळी पालकमंत्री उदय सामंत यांनीदेखील आपले विचार मांडले. ते म्हणाले की, साळवी स्टॉप येथे एक कॉर्नर आहे आणि त्या ठिकाणी एक कॉर्नर सभा एक हजार खुर्च्या लावून होत आहे. मात्र मनसेचा हा ट्रेलर आहे. राणेंसाठी मनसेचा पिक्चर बाकी आहे. जिल्ह्यात कुठेही मनसे कार्यकर्त्यांवर अन्याय होणार नाही असा शब्द ना. सामंत यांनी दिला.
ना. सामंत पुढे म्हणाले की, महाराष्ट्रात परिवर्तनाची लाट आहे. ४५ पेक्षा जास्त उमेदवार महायुतीचे निवडून येतील. छत्रपती शिवाजी महाराजांना मानणारे सरकार हे महायुतीचे आहे. यापुढे एकदिलाने काम करुया असे आवाहनदेखील त्यांनी केले. तसेच मनसेने दिलसे आमच्यासोबत काम करावे, आम्हीदेखील दिलसे स्वागत करू असे ते म्हणाले.
यावेळी मनसेचे नेते संदिप देशपांडे यांनी तुफान फटकेबाजी केली. उठसूठ राज ठाकरेंवर बोलले जाते. यापुढे राज ठाकरेंवर बोलाल तर याद राखा, भुंकणार्यांच्या पेकाटात लाथ मारण्याची ताकद मनसैनिकांमध्ये आहे. आमच्या नादाला लागू नका असा इशारादेखील त्यांनी यावेळी दिला.
यावेळी मनसेचे नेते माजी आमदार नितीन सरदेसाई यांनी बोलताना सांगितले की, नारायण राणे यांचे काम आम्ही जवळून पाहिले आहे. ते मंत्री असताना एका चुटकीसरशी माझी अडकलेली दोन कामे मार्गी लावली. संघर्षातून तुम्ही पुढे आला आहात. यावेळी सर्वाधिक मताधिक्याने तुमचा विजय होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.