रत्नागिरी:- महाविकास आघाडी सरकार कोसळल्यानंतर भाजपाने नवीन सत्ता स्थापन करताना ट्विस्ट निर्माण करीत एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रीपदी बसवण्याचा निर्णय घेतला आहे. ना. शिंदे यांच्यासोबत गेलेले रत्नागिरीचे आ. व माजी मंत्री उदय सामंत यांची मंत्रिमंडळातील निवड निश्चित असून रत्नागिरीचे पालकमंत्री म्हणून जबाबदारीही मिळणार असल्याचा विश्वास समर्थकांकडून व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळे त्यांच्या स्वागताची जोरदार तयारी सुरु झाली आहे.
आ. उदय सामंत हे ना. एकनाथ शिंदे यांच्या गटात सहभागी झाल्यानंतर रत्नागिरीमध्ये शिवसेनेने बैठकांवर बैठका घेत सेनेची मोट बांधण्यास सुरुवात केली आहे. थेट आ. सामंत यांच्या विरोधात कोणतेही वक्तव्य किंवा घोषणा दिल्या जाणार नाहीत याचीही काळजी यावेळी स्थानिक पदाधिकार्यांकडून घेतली जात आहे. आ. सामंत यांच्या अगदी जवळच्या पदाधिकारी असलेल्या व्यक्तिंना या बैठकांना बोलावण्यात येत असले तरी त्यांच्यावर किती विश्वास ठेवावा हा प्रश्नही ज्येष्ठ शिवसेना पदाधिकार्यांना पडला आहे. आ. सामंत हे पुन्हा मंत्री म्हणून येणार याचा विश्वासही असल्याने, त्यांना दुखवायचे कसे असा प्रश्न शिवसेना पदाधिकार्यांना पडला आहे.
ना. एकनाथ शिंदे यांची मुख्यमंत्रीपदी निवड झाल्याने लवकरच ना. उदय सामंत यांची निवड मंत्रिमंडळात शपथविधी होईल. मंत्रीपदाबरोबरच त्यांच्यावर पालकमंत्री पदाची जबाबदारी येणार असल्याचा विश्वास त्यांचे समर्थक व्यक्त करीत आहेत. त्यामुळे आ. सामंत मंत्री व पालकमंत्री झाल्यावर रत्नागिरीत त्यांचे जोरदार स्वागत करण्याची तयारीही सुरु करण्यात आली आहे.
आ. सामंत यांना पालकमंत्री पद मिळाल्यास रत्नागिरीचा चेहरामोहरा पूर्णत: बदलून जाणार असल्याचा विश्वासही समर्थकांकडून व्यक्त होत आहे. नव्या मंत्रिमंडळात सहभागी असल्याने ग्रामीण भागातील महत्वाकांक्षी नळपाणी योजना, शहरातील काँक्रीटचे रस्ते या योजनांनाही त्यामुळे आता गती मिळेल अशा भावना शहरातील पदाधिकार्यांनी व्यक्त केल्या. शिंदेंना पाठिंबा दिल्यामुळे रत्नागिरीच्या विकासाला अधिक गती येणार आहे.