उदय बनेंची समजूत काढण्यासाठी पदाधिकारी निवडीत मोठे फेरबदल 

जि. प. अध्यक्षपदी विक्रांत जाधव

रत्नागिरी:- रत्नागिरी जिल्हा परिषदेतील अध्यक्ष पदाच्या निवडीचा पेच अखेर सुटला असला तरी ज्येष्ठ सदस्य उदय बने यांची समजूत काढताना पदाधिकारी निवडीत मोठे फेरबदल करण्यात आले. उपाध्यक्षपद उदय बने यांना देताना त्यांच्याकडे बांधकाम व आरोग्य समितीचा पदभार देण्यात आला आहे. प्रथमच उपाध्यक्ष यांच्याकडील कृषी खाते काढून दुसरे खाते देण्यात आले आहे. 
 

जि. प. अध्यक्ष पदासाठी आमदार भास्कर जाधव यांचे पुत्र विक्रांत जाधव यांचे नाव अंतिम करण्यात आले आहे. तर अध्यक्ष पदाच्या शर्यतीतील प्रबळ दावेदार उदय बने यांना उपाध्यक्ष पद देण्याचा निर्णय शिवसेना नेत्यांनी घेतला आहे. उपाध्यक्ष पदासह त्यांना बांधकाम व आरोग्य समिती हे महत्त्वाचं खातं देण्यात आला आहे. 

सोमवारी सकाळी 11.30 वाजता ही नावे अंतिम करण्यात आली. अध्यक्ष, उपाध्यक्ष निवडीसह महिला व बाल कल्याण समिती सभापती पदासाठी भारती  सरवणकर, शिक्षण सभापती पदासाठी चंद्रकांत मणचेकर, समाजकल्याण परशुराम कदम तर कृषी सभापती पदासाठी रेश्मा झगडे यांची निवड करण्यात आली आहे.