उत्तर प्रदेशमधील अल्पवयीन मुलीला पळवून आणणाऱ्याला थरारक पाठलाग करून पकडले

गुहागर:- उत्तर प्रदेशमधून अल्पवयीन मुलीशी विवाह करुन तिला पळवून आणून गुहागर तालुक्यातील पाटपन्हाळे येथे गेले पाच महिने वास्तव्य करुन असलेल्या आरोपीने शोधावर आलेल्या उत्तरप्रदेश पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पळाला. मात्र, गुहागर पोलिसांनी थरारक पाठलाग करुन या आरोपीला पकडून ताब्यात दिले.

उत्तरप्रदेशमधून एक आरोपी चेतन झल्लू निषाद हा जानेवारी २०२३ मध्ये अल्पवयीन मुलीशी विवाह करुन पळाला होता. त्याच्या मोबाईलच्या जुन्या सीमकार्डच्या आधारे गुजरात, गोवा याठिकाणी शोध घेऊनही तो आरोपी सापडला नव्हता. मात्र, या आरोपीला त्याच्या शेजाऱ्याने दिलेल्या ‘एका सीमकार्डच्या लोकेशनवरुन तो आरोपी गुहागर या ठिकाणी असल्याची माहिती उत्तरप्रदेश पोलिसांना मिळाली होती. त्याचा तपास करत पोलीस अंकित सिंग व आशिष शर्मा हे शुक्रवारी गुहागरमध्ये आले होते. त्यांनी गुहागर पोलिसांच्या मदतीने त्या आरोपीचे घर शोधून काढले.

पाटपन्हाळे बस थांब्याजवळील एका चाळीमध्ये तो राहत असल्याचे आढळले. त्याला त्वरीत ताब्यात घेण्यात आले. याच दरम्यान, आरोपीने उत्तर प्रदेश पोलिसांच्या हातावर तुरी देत त्या ठिकाणाहून पळ काढला. काहीवेळ शोधाशोध केल्यानंतर उत्तरप्रदेश पोलीस अल्पवयीन मुलीला घेऊन पुन्हा उत्तरप्रदेशकडे निघाले. या दरम्यान, गुहागर पोलीस प्रमोद मोहिते, प्रथमेश कदम व प्रितेश रहाटे या दोघांनी आरोपीचा पाठलाग करुन शृंगारतळीतील एका मॉलच्या बिल्डींगमध्ये त्याला पकडले. त्यांनी उत्तरप्रदेश पोलिसांना त्वरीत कळवले. तोपर्यंत हे पोलीस देवघरपर्यंत गेले होते मात्र, त्यांना पकडल्याची खबर मिळताच ते शृंगारतळीत परत आले व त्यांनी आरोपीला ताब्यात घेतले. यावेळी गुहागर पोलिसांच्या कर्तबगारीचे अधिक कौतुक करण्यात आले.

हा आरोपी अल्पवयीन मुलीसह पाटपन्हाळे बसथांब्याजवळील एका चाळीत रहात होता. ही खोली एका स्थानिक भाजीविक्रेत्याने भाड्याने घेतली होती. मात्र, तो भाजीविक्रेता चिपळुणात रहायचा असे समजते. याची चाळ मालकाला कोणतीही कल्पना नव्हती. भाजीविक्रेत्यानेच या आरोपीला येथे राहण्यास खोली दिली होती. या खोलीच्या बाजूला राहणाऱ्या एका शेजाऱ्याने या आरोपीला मोबाईल सीमकार्डही काढून दिले होते. एकप्रकारे या आरोपीला येथे वास्तव्याचे अप्रत्यक्षरित्या संरक्षणच मिळाले होते. गेले पाच महिने तो येथे निर्धास्तपणे राहत होता. नोव्हेंबर २०२२ पासून या आरोपीच्या शोधात उत्तरप्रदेश पोलीस होते. मात्र, तो त्यांना सापडला नव्हता. अखेर गुहागर येथे तो सापडला.