रत्नागिरी:-रत्नागिरी शहराला पाणी पुरवठा करणार्या शिळ धरणात 1.939 दशलक्ष घनमीटर इतका पाणीसाठा आहे. शहराला प्रतिदिन 1.8 ते 2 दशलक्ष लिटर पाणी पुरवठा करावा लागतो. त्यानुसार 15 जुलैपर्यंत पुरेल इतका पाणीसाठा शिल्लक आहे. गेल्यावर्षीच्या तुलनेत शिळ धरणातील 14 मार्च रोजी 2.361 द.ल.घ.मी. पाणीसाठा होता. अडीच महिन्यांपूर्वीपासून पानवल धरणातील पाणीपुरवठा बंद झाल्याने सर्व भार शिळ धरणावर पडला होता.
रत्नागिरी शहरात 10,288 नळजोडण्या आहेत. जुनी जीर्ण झालेल्या जलवाहिनीतून पाणी पुरवठा सुरू होता तेव्हा या जलवाहिनी वरचेवर फुटत होत्या. त्यामुळे मोठ्या प्रमाणात पाणी वाया जात होते. परिणामी एप्रिल महिन्यापासून एक दिवस आड पाणी पुरवठा करावा लागत होता. परंतु, गेल्यावर्षीपासून नवीन नळपाणी योजनेच्या जलवाहिन्यांचा वापर होऊ लागल्यानंतर उन्हाळ्यात दररोज पाणी पुरवठा सुरूच राहिला. दरवर्षी फेब्रुवारी महिन्यात पानवल धरणातील पाणीसाठा संपुष्टात येत होता. त्यामुळे उन्हाळ्यातील पाणी पुरवठ्याची गरज शिळ धरणालाच पूर्ण करावी लागत होती. सध्या मार्च महिना संपत आला तरी पानवल धरणातील पाणीसाठा संपलेला नाही.
पानवल धरणातून येणारे पाणी नाचणे येथील जलशुद्धीकरण केंद्रातून शुद्ध होऊन शहरातील काही भागांना पुरवले जात होते. नवीन नळपाणी योजनेंतर्गत हे जलशुद्धीकरण केंद्र नव्याने उभारले जात आहे. त्यामुळे या पानवल धरणातील पाण्याचा वापरच न झाल्याने पाणीसाठा शिल्लक राहिला आहे. त्यामुळे पानवल धरणातून मिळणार्या पाण्याचा भार शिळ धरणावर पडला. त्याचबरोबर या धरणाच्या झडपांचे काम करताना त्यांची उघडझाप करावी लागल्याने काही प्रमाणात पाणी वाहून गेले आहे. त्यामुळे शिळ धरणात गेल्यावर्षीपेक्षा यावर्षी पाणीसाठा कमी झाला आहे.
पानवल धरणातील पाणी मेपासून पुरवणार असून
नाचणेतील नूतन जलशुद्धीकरण केंद्राचे काम येत्या मे महिन्यापर्यंत पूर्ण होईल. त्यानंतर पानवल धरणात शिल्लक राहिलेला पाणीसाठा रत्नागिरीकरांसाठी पुरवला जाणार आहे. त्यामुळे यंदा शहरवासियांची धरणात पाणी नाही म्हणून अडचण होणार नाही.