उंबर्ले येथे घरफोडी, संशयित अटकेत

दापोली:- दापोली तालुक्यातील उंबर्ले येथे असलेल्या साई द्वारका गृह संकुल मध्ये घरफोडी करून सुमारे ११,००० रुपयाचे साहित्य लंपास केल्याची घटना ६ जून रोजी संध्या. ६ ते १३ जून सकाळी ८ वाजण्याच्या मुदतीत घडली.

दापोली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अनुप चंद्रकांत कळंबटे (वय ३४, रा. दाभोळ श्रीराम नगर) हे साई द्वारका गृह संकुल उंबर्ले येथे व्यवस्थापक म्हणून कामाला आहेत.

त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार ६ जून रोजी संध्याकाळी ६ ते १३ जून सकाळी ८ वाजण्याच्या मुदतीत साई द्वारका गृह संकुला मधील बिल्डिंग नंबर ६ रो हाऊस नंबर ३ व बिल्डिंग नंबर २ रूम नंबर ४ यामध्ये घरफोडी होऊन ५ हजार रुपये किमतीचा १ पांढऱ्या रंगाचा इन्व्हर्टर, ५,००० रुपये किमतीचा १ राखाडी रंगाचा ओव्हन व १ हजार रुपये किमतीचे काळ्या रंगाचे दोन डंबेल्स असे एकूण अकरा हजार रुपये किमतीचे साहित्य चोरी झाले आहे.

सदर चोरी झालेल्या मुदतीत लंकेश शंकर शिगवण राहणार तेरेवांयंगणी हा इसम त्या ठिकाणी संशयितरित्या फिरत असल्याने सदर चोरी त्याने केली असल्यास चा संशय अनुप कळंबटे यांनी आपल्या तक्रारीत व्यक्त केला आहे. दापोली पोलीस स्थानकात शिगवण याच्या विरोधात भादविस कलम ४५४ ४५७ ३८० प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून दापोली पोलिसांनी १८ जून रोजी संध्याकाळी ७:३० वाजता त्याला अटक केली आहे. याप्रकरणी अधिक तपास दापोली पोलीस करीत आहेत.