रत्नागिरी:- लॉकर तपासणीसाठी आ.राजन साळवी यांना एसीबीने घरातून बाहेर काढताच शिवसैनिक आणि पोलीस यांच्यात चांगलीच तू तू मै मै रंगली. संतप्त झालेल्या शिवसैनिकांनी आ.राजन साळवींना गराडा घातल्याने पोलिसांची मोठी दमछाक उडाली. न्यायचं असेल तर आमच्या गाडीतून न्या अन्यथा पुढे जाऊ देणार नाही, असा पवित्रा शिवसैनिकांनी घेतल्याने २० मिनिटे बंगल्याबाहेर पोलीस आणि शिवसैनिक यांच्यात खडाजंगी झाली.
सकाळी ८.४५ वा.पासून आ.राजन साळवी यांच्या बंगल्यासह त्यांच्या नातेवाईकांच्या घरी एसीबीच्या धाडी पडल्या. दिवसभर बंगल्याबाहेर शिवसैनिक ठाण मांडून होते. तर एसीबीचे अधिकारी आणि कर्मचारी बंगल्यात कागदपत्रांची पडताळणी करत होते. त्याच दरम्यान पोलिसांनी शिवसैनिकांना रस्त्यावर जाण्याच्या सूचना केल्या. मात्र आ.राजन साळवी यांना अटक होईल या शक्यतेने शिवसैनिकांनी बंंगल्याबाहेर जाण्यास नकार दिला.
डीवाय.एस.पी. आले
बंगल्यात व बंगल्याबाहेर शिवसैनिकांची मोठी गर्दी झाली होती. याचवेळी ए.सी.बी.च्या टीमला आरडीसी बँकेतील लॉकर तपासणीसाठी आ.साळवी यांना बँकेत न्यायचे होते. मात्र गर्दी हटत नसल्याने पोलिसांची दमछाक झाली. अखेर डीवाय.एस.पी. विनीत चौधरी घटनास्थळी पोहोचले आणि शिवसेनेच्या पदाधिकार्यांना समजावून सांगत अखेर शिवसैनिकांना रस्त्यावर एका बाजूला आणले.
पोलिसांच्या गराड्यात बाहेर
शिवसैनिक रस्त्यावर गेल्यानंतर पोलिसांच्या गराड्यात आ.राजन साळवी यांना बाहेर आणण्यात आले. आ.साळवी यांना अटक झाली असा समज करुन शिवसैनिकांनी रस्त्यात साळवींना गराडा घातला. यावेळी पोलीस आणि शिवसैनिक यांच्यात चांगलीच चकमक उडाली. शिवसैनिक कमालीचे संतप्त झाले होते.
पोलीस गाडीत बसू देणार नाही
आ.राजन साळवी यांना आरडीसी बँकेतील लॉकर उघडण्यासाठी घेवून जात असताना शिवसैनिकांनी पोलीस गाडीत बसवण्यास जोरदार विरोध केला. कोणत्याही परिस्थितीत पोलीस गाडीत बसू देणार नाही. न्यायचे तर आमच्या गाडीतून न्या असा आक्रमक पवित्रा शिवसैनिकांनी घेतला होता. त्यामुळे तू तू मै मै चांगलीच रंगली. अखेरीस पोलिसांनी आ.साळवींना त्यांच्या खासगी गाडीतून गाडीतळ येथील आर.डी.सी.बँकेत घेवून गेले.
१५ मिनिटांनंतर बाहेर
निवडक पोलीस अधिकारी आणि आ.राजन साळवी हे बँकेत गेले होते. तेथील आ.राजन साळवी यांच्या नावे असलेले लॉकर उघडण्यात आले व त्याची तपासणी करण्यात आली. १५ मिनिटे ही तपासणी सुरु होती. बँकेतून बाहेर आल्यानंतर पुन्हा आ.साळवी यांना पोलीस त्यांच्या बंगल्यात घेवून गेले.