२८ जूनला कार्यालयात हजर राहण्याचे आदेश
रत्नागिरी:- येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभाग कार्यालय कडून उद्धव ठाकरे शिवसेना पक्षाचे आमदार वैभव नाईक यांना जबाब नोंदणीसाठी पुन्हा नोटीस बजावण्यात आली आहे. तसेच दि. २८ जून २०२३ रोजी सकाळी ११ वाजता रत्नागिरी येथील कार्यालयात उपस्थित राहण्याबाबत कळविण्यात आले आहे.
लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडून आपल्या मालमत्तेच्या अनुषंगाने चौकशी सुरु करण्यात आली आहे. या उघड चौकशीच्या अनुषंगाने दि. १ जानेवारी २००२ ते २९ सप्टेंबर २०२२ या कालावधीतील आपले उत्पन्न, खर्च व मालमत्ता याबाबत मत्ता व दायित्वाचे १ ते ६ फॉर्म्स त्यामध्ये नमुद मुद्याच्या अनुषंगाने भरुन दिलेले आहेत. त्या फॉर्म्स मधील आपण दिलेल्या माहितीच्या अनुषंगाने आपला जबाब नोंद करण्यासाठी १२ ऑक्टोबर २०२२, ९ नोव्हेंबर २०२२, ३०नोव्हेंबर २०२२,२डिसेंबर २०२२, ९डिसेंबर २०२२ व ३ जानेवारी २०२३ रोजी सकाळी ११ वाजता लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, रत्नागिरी कार्यालयात उपस्थित रहाण्याबाबत कळविण्यात आले आहे.
परंतु त्यावेळी आपण उपस्थित राहिलेले नाहीत. त्या उघड चौकशीच्या अनुषंगाने विविध माहिती व कागदपत्रे सादर करण्यासाठी आपण दि. २८ जून २०२३ रोजी सकाळी ११ वाजता लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, रत्नागिरी कार्यालय येथे उपस्थित रहावे. अशी सूचना लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, रत्नागिरीचे पोलिस उपअधीक्षक सुशांत चव्हाण यांनी या नोटिशीद्वारे केली आहे. दरम्यान, आमदार वैभव नाईक चौकशीसाठी उपस्थित राहतात का ? याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.