आ. राजन साळवींचं ठरलं? रत्नागिरीतून लढणार; शुभेच्छा फलकातून दिले संकेत

रत्नागिरी:- विधानसभा निवडणुका किमान वर्षभरावर येऊन ठेपली आहे. अद्याप कोणत्या मतदारसंघात उमेदवार कोण? हे निश्चित झालेले नाही. पण अनेक संभाव्य उमेदवारांची चर्चा सुरु झालेली आहे. अशात उद्योगमंत्री ना.उदय सामंत यांच्या रत्नागिरी विधानसभा मतदार संघात राजापूरचे आमदार राजन साळवी यांच्या वाढदिवसानिमित्त ‘निष्ठावंत वाघाची रत्नागिरीमध्ये एन्र्टी’ अशा मजकूराचे बॅनर लावण्यात आल्याने आ.राजन साळवी ना.उदय सामंत यांच्या मतदार संघातून निवडणूकीला उभे राहणार का? असा प्रश्न निर्माण झाला आहे.

कोकण हा शिवसेनेचा बालेकिल्ला. त्यामुळे शिवसेनेत झालेल्या मोठ्या बंडानंतर कोकणी मतदार कुणाच्या मागे उभा राहणार? कोकणातला विधानसभा मतदारसंघांसहित लोकसभा मतदारसंघात उमेदवार कोण असणार? याबाबत आतापासूनच चर्चा सुरु झालेली आहे. अशाच एका मतदारसंघापैकी एक म्हणजे रत्नागिरी- संगमेश्वर विधानसभा मतदारसंघ! उद्योगमंत्री उदय सामंत यांचा हा पारंपरिक मतदारसंघ. राष्ट्रवादीमधून शिवसेनेमध्ये आलेल्या ना. उदय सामंत यांना २०१४ आणि २०१९ च्या विधानसभा निवडणुकीमध्ये चांगलं मताधिक्य मिळालं. पण ना. उदय सामंत यांनी ना. एकनाथ शिंदे यांची साथ देण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे सामंत यांना कुणाचं आव्हान? त्यांच्यासमोर तगडा उमेदवार कोण? या प्रश्नाचे उत्तर शोधत असताना अनेकजण आ. राजन साळवी यांच्या नावाकडे लक्ष वेधतात. मी माझ्याच मतदार संघातून लढणार असे वारंवार सांगणार्या आ.राजन साळवी यांच्या वाढदिवसानिमित्त लागलेल्या बॅनरमुळे रत्नागिरीमध्ये राजन साळवी हे ठाकरे गटाकडून संभाव्य उमेदवार असू शकतात का? अशा चर्चा सुरु झाल्या आहेत.

राजन साळवी यांचा आज दि. ९ जुलै रोजी वाढदिवस आहे. त्यापूर्वी रत्नागिरी शहरांमध्ये लागलेले बॅनर चर्चेचा विषय ठरले आहेत. कारण ‘निष्ठावंत वाघाची रत्नागिरीमध्ये एन्र्टी’असा मजकूर या बॅनरवर आहे. राजन साळवी विधानसभा निवडणुकीमध्ये आपला मतदारसंघ बदलणार का? याची चर्चा मतदार संघात सुुरु झाली आहे. राजन साळवी हे मूळचे रत्नागिरीतील आहेत. त्यांच्या राजकीय कारकीर्दीची सुरुवात रत्नागिरीमधून झाली. ग्रामीण भागामध्ये देखील त्यांचा संपर्क चांगला आहे. राजन साळवी सक्रिय झाल्यास शिवसेनेचे जुने निष्ठावंत त्यांच्या मागे खंबीरपणे उभे राहू शकतात. शिवसेनेतल्या फुटीनंतर रत्नागिरीमधून शिवसैनिकांची किंवा जुन्या शिवसैनिकांची मोठ्याप्रमाणात फूट झालेली दिसून येत नाही. त्याचा फायदा राजन साळवी यांना होऊ शकतो. पण असं असलं तरी ना. उदय सामंत यांना हलक्यात घेऊन चालणार नाही. सलग चार टर्म त्यांनी आमदारकीची जबाबदारी पार पडलेली आहे. ग्रामीण भागामध्ये देखील त्यांचा संपर्क चांगला आहे. शिवाय त्यांच्या घरातून देखील त्यांना मोठा पाठिंबा आहे. आर्थिक आघाडीवर देखील राजन साळवी यांच्या तुलनेत उदय सामंत उजवे ठरतात. त्यामुळे ही लढाई नक्कीच रंजक होऊ शकते. असे असले तरी रंजक लढाई पहाण्यासाठी वर्षभर तरी थांबावे लागणार आहे.