रत्नागिरी:- मिरजोळे एमआयडीसीतील एका नव्याने झालेल्या हॉटेलमध्ये शेफ म्हणून कामाला असलेल्या कामगाराच्या सुपिक डोक्यातून आलेली कल्पना म्हणजे ही आर्जू टेकसोल कंपनी आहे. विशेष म्हणजे ना संचालक, ना कंपनीत कोणतेही पद, ना पर्दाफाश झाल्यानंतर कागदपत्रात नसणारा हा पडद्यामागील मास्टर माईंड अनी जाधव नामक व्यक्ती असल्याचे पोलिस तपासात पुढे आले आहे. पोलिसांनी त्यादृष्टीने तपासाला दिशा देत त्याचा शोध सुरू केला आहे.
गुंतवणुकदारांना विविध आमिष देत स्वयंरोजगाराचे गाजर दाखवत ही हजारो गुंतवणुकदारांची फसवणुक केल्याचे निष्पन्न झाले आहे. कंपनीच्या विरोधातील तक्रारींचा ओघ वाढत असून हा आकडा पावणे दोनशेच्या घरात गेला आहे. अनेकांनी कर्ज काढुन, दागिने गहाण ठेऊन आर्जुमध्ये गुंतवणुक केली आहे. गुंतवणुक करणाऱ्यांना हळूहळू परतावाही मिळत होता. परंतु कंपनी संशयाच्या भोवऱ्यात आली आणि अनेकांची देणी थकली त्यामुळे कंपनीविरुद्ध गुंतवणुदारांनी तक्रार केली. त्यावरून गुन्हा दाखल करत दोन संचालकांना अटक केली.
जिल्हा आर्थिक गुन्हे शाखेकडे हा तपास असून कंपनीचे एमआयडीसीतील सुसज्ज ऑफिस, एक प्रशिक्षण केंद्र, गोदाम सील केली आहेत. मशिनरीसह कच्चा, पक्का असा सुमारे ४ कोटीचा माल पडून असल्याचे समजते. परंतू कंपनीचे हे खुळ एमआयडीसीत एका हॉटेलमध्ये कामाला असलेल्या अनी नामक व्यक्तीने संचालकांच्या डोक्यात घातले. शेफ म्हणून काम करत असताना संशयित त्याच्या संपर्कात आले. तेव्हा त्याने हा गुंतवणुकीचा फंडा त्यांना सांगितला आणि आर्जु टेकसोल कंपनी स्थापन झाली. विशेष म्हणजे हा मास्टर माईंड कंपनीध्ये कोणत्याच पदावर नाही. पडद्यामागून त्याने ही सूत्र हालवत कंपनी चालवली. परंतु आता तो कोणत्याही चित्रात नसल्याने पोलिस या मास्टमाईंडच्या मागावर आहेत.