आर्जु कपंनीच्या अधिकाऱ्यांना धमकावून खंडणी उकळणाऱ्या तिघांवर गुन्हा

रत्नागिरी:- अर्थिक व्यवहाराच्या अडचणीत सापडलेल्या ‘आर्जू टेकसोल’ कंपनीच्या संचालकांना कंपनी बंद पाडण्यासह पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्याची धमकी देत सुमारे १ लाख २० हजार रुपयांची खंडणी वसूल केल्याप्रकरणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शहर संघटक अमोल श्रीनाथ याच्यासह साईश मयेकर, शेखर नलावडे (सर्व रा.रत्नागिरी) या तिघांविरोधात शहर पोलीस स्थानकात भा.द.वि.का.क.३८४, ३८५, ३४ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मार्च २०२४ ते २४ एप्रिल या कालावधीत हा गुन्हा घडला आहे.

अमोल अनिल पाटील ( वय ३८ रा. पंड्येवाडी मिरजोळे यांनी शहर पोलीस स्थानकात दिलेल्या तक्रारीनुसार मार्च २०२४ ते दि. २४ एप्रिल २०२४ या कालावधीत आर्जू टेकसोल प्रा.लि.या कंपनी मध्ये गुंतवणुकदारांनी बनविलेल्या मालाची विक्री होत नसल्याचे तसेच कंपनीमध्ये काही गुंतवणुकदारांचे पैसे देणे बाकी होते. काही लोकांनी काम सोडून दिल्याने कंपनीच्या आर्थिक व्यवहारात अडचणी निर्माण झाल्या होत्या. याच संधीचा फायदा घेत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शहर संघटक अमोल श्रीनाथ, साईश मयेकर, शेखर नलावडे यांनी संचालकांना दमदाटी करत कंपनी बंद करण्यासह पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्याची धमकी देत ॲनी जाधव तसेच आर्जू टेकसोल कंपनीकडून अमोल पाटील यांच्या मार्फत अमोल श्रीनाथ याने दि.२२ मार्च रोजी १ लाख रुपये तर कंपनीतील गुंतवणुकदार सायली सरफरे यांच्या कडून साईश मयेकर यांने २३ एप्रिल रोजी दहा हजार रु. तर २४ एप्रिल रोजी १० हजार रु. असे तिघांनी एकूण १ लाख २० हजार रुपये जबरदस्तीने खंडणी म्हणून घेतल्याची तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार पोलीसांनी तिघांविरोधात भा.द.वि.का.क.३८४, ३८५, ३४ नुसार गुन्हा दाखल केला आहे.
आर्जू टेकसोल कंपनीच्या विरोधात मनसे शहर संघटक अमोल श्रीनाथ व त्याच्या सहकार्यांनी आंदोलन केले होते. त्यानंतर कंपनी व्यवस्थापनाला गुंतवणुकदारांचे पैसे परत करण्याची सुचना केली होती. याच दरम्यान त्यांनी कंपनीकडून खंडणी वसूल केल्याचे पुढे आल्यामुळे जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.