रत्नागिरी:- खवंयांच्या जिभेचे चोचले पुरवणारी मारूती मंदिर येथील खाऊगल्ली अस्वच्छतेमुळे चर्चेत होती. मात्र रत्नागिरी नगर परिषदेचे आरोग्य सभापती निमेश नायर यांनी खाऊगल्लीला स्वच्छतेचे धडे देत साफसफाई केली. स्टॉलधारकांना जागा आखून दिल्या आहेत. प्रवेशद्वारावरील अडचणही बाजूला करून त्यामध्ये नीटनेटकेपणा आणला.
आरोग्य सभापती निमेश नायर यांनी शहरातील महत्त्वाच्या आणि सार्वजनिक ठिकाणांच्या स्वच्छतेवर भर दिला आहे. त्यांनी दुर्गंधीचे आगर बनलेल्या मच्छीमार्केटची कर्मचार्यांना मदतीने स्वच्छता केली. कित्येक वर्षानंतर मच्छीमार्केटची साफसफाई झाली होती. त्याचे सर्वांनीच कौतुक केले. आता शहरातील नागरिक एक विरंगुळा म्हणून मारूती मंदिर येथील खाऊगल्लीत जातात. तिथे काहीच वेळ काढत चमचमीत पदार्थांवर ताव मारतात. पालिकेने ही खाऊगल्ली विकसित केली आहे. मात्र त्या ठिकाणी स्टॉलधारकांनी आपल्यापद्धतीने छत-मांडव घालून अतिशय दाटीवाटीने हे स्टॉलधारक पदार्थांची विक्री करतात. त्यात काहींना जास्त तर काहींना कमी झाला आली आहे. त्यानंतर अनेकजण विक्रीनंतरच जमा झालेला कचरा रात्री उशिरा घरी घेऊन जातात किंवा काही तिथेच टाकतात. सांडपाण्याचाही तेथे प्रश्न आहे. त्यामुळे प्रचंड दुर्गंधी पसरते.
खाऊगल्ली हे महत्त्वाचे सार्वजनिक ठिकाण आहे. त्यामुळे त्याची स्वच्छता होणे गरजेचे असल्याने निमेश नायर यांनी काल खाऊगल्लीची स्वच्छता केली. स्टॉलधारकांनी बांधलेले छोटे मांडव, हटवून संपूर्ण भाग स्वच्छ केला. तसेच तेथे सुटसुटीतपणा यावा, सायाठी समान जागा आखून दिली आहे. स्टॉलधारकांचा कचरा इतरत्र न टाकता रात्री तेथे पालिकेची घंटागाडी येईल. त्यामध्ये टाकण्याचा निर्णय झाला. खाऊगल्लीला आरोग्य सभापतींनी स्वच्छतेचे चांगलेच धडे दिले असून याची अमलबजावणी करण्याचे व्यावसायिकांनी मान्य केले आहे.