रत्नागिरी:- निविदा प्रक्रिया राबविताना ठेकेदाराकडून तुटपुंजा पगार मिळत असल्यामुळे गेली दोन वर्षे नाराज असलेल्या जिल्हा परिषद आरोग्य विभागातील रुग्णवाहिका चालकांना अध्यक्ष रोहन बने आणि आरोग्य सभापती बाबू म्हाप यांनी दिलासादायक निर्णय घेतला आहे. त्यांच्या निर्णयामुळे महिन्याला आठ हजार रुपये मिळणार्या वेतनात पाच हजाराची वाढ झाली असून बुधवारी (ता. 10) त्यावर शिक्कामोर्तब झाला.
जिल्हा परिषदेच्या प्राथमिक आरोग्य केंद्राच्या ठिकाणी असलेल्या रुग्णवाहिकांवर कंत्राटी पध्दतीने चालकांची नेमणुक करण्यात आली होती. विशिष्ठ कालावधीनंतर याची निविदा काढली जाते. मात्र ठेकेदाराकडून रुग्णवाहीकांवरील चालकांना मिळणारा पगार हा तुटपुंजा असतो. हा पगार वाढविण्यासाठी गेली दोन वर्षे चालकांकडून प्रयत्न सुरु होते. यासाठी जिल्हा परिषद सर्वसाधारण सभेतही चर्चा झाल्या. परंतु त्यावर निर्णय झालेला नव्हता. तांत्रिक अडचणीमुळे हा निर्णय होत नव्हता. या रुग्णवाहिकांना महिन्याला 8 हजार रुपये मिळत होते. त्यात वाढ व्हावी यासाठी प्रयत्न सुरु होता. सव्वा वर्षांपुर्वी अध्यक्षपदाची सुत्रे घेतल्यानंतर रोहन बने यांच्यासह आरोग्य सभापती बाबू म्हाप यांनी यावर तोडगा काढण्यासाठी अधिकार्यांकडे पाठपुरावा सुरु केला. त्यात येणार्या तांत्रिक अडचणी सोडवून अखेर त्या चालकांना महिन्याला 13 हजार 848 रुपये मिळणार आहेत. हे पैसे थेट चालकांच्या बँक खात्यावर जमा करण्याची अट घालूनच निविदा काढण्यात येत आहे. यावर बुधवारी शिक्कामोर्तब झाला. याचा फायदा जिल्ह्यातील 67 चालकांना मिळणार आहे. गेल्या वर्षभरात अध्यक्ष बने यांनी जिल्हा परिषदेतील विविध कामांचा निपटारा केला आहे. त्यामुळे अधिकारी, कर्मचार्यांमधून समाधान व्यक्त केले जात आहे.