रत्नागिरी:- शहरातील आरोग्य मंदिर येथे रविवारी रात्री 10.30 वाजण्याच्या सुमारास बुलेटने चारचाकी होंडा सिटीला जोरदार धडक दिली. या अपघातात बुलेटवरील तरुणी जखमी झाली असून तिला उपचारासाठी खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
मारुती मंदिर येथून कुवारबावच्या दिशेने बुलेट चालक निघाला होता. चालक आरोग्य मंदिर येथे आला असता येथील रस्त्यावरून टर्न मारणाऱ्या होंडा सिटी कारला बुलेटची जोरदार धडक बसली. या धडकेत बुलेटवरील तरुणी रस्त्यावर फेकली गेली. तिला गंभीर दुखापत झाली असून उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अपघातात कारच्या दर्शनी भागाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. कारमधील ऑईल रस्त्यावर पडले होते. यावरूनच अपघाताची भीषणता लक्षात येते. रात्री 11 वाजण्याच्या सुमारास पोलिस घटनास्थळी दाखल झाले. अपघाता नंतर घटनास्थळी वाहतूक कोंडी झाली होती.