रत्नागिरी:-जास्त बायोवेस्ट कचरा गोळा होणाऱ्या आरोग्य केंद्राच्या ठिकाणी हा कचरा उचलण्याचे नियोजन करावे. यातून बायोवेस्ट कचरा उचलण्यासाठी येणाऱ्या खर्चाचा अंदाज येईल आणि टप्प्याटप्प्याने इतर आरोग्य केंद्रामध्ये याबाबतचे नियोजन करावे अशी मागणी जि. प. सदस्या मिनल काणेकर यांनी केली.
जिल्हा परिषदेच्या प्राथमिक आरोग्य केंद्रातील बायोवेस्ट विल्हेवाट नियोजना बाबत नुकत्याच झालेल्या आरोग्य समितीच्या बैठकीत चर्चा करण्यात आली. आरोग्य केंद्रातील बायोवेस्ट कचरा एकत्र करून त्याची योग्य विल्हेवाट लावावी असा विषय जि. प. सदस्या मिनल काणेकर यांनी मांडला. बायोवेस्ट कचरा गोळा करणे ही बाब खर्चिक असल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे आले. बायोवेस्ट हा आरोग्य केंद्रातील महत्त्वाचा विषय असून याची विल्हेवाट योग्य प्रकारे झाली तर आरोग्य केंद्र परिसरातील कचरा व पर्यायाने होणारी दुर्गंधी कमी होईल व कचऱ्याची विल्हेवाट योग्य प्रकारे लागू शकते असा मुद्दा उपस्थित करण्यात आला. आरोग्य केंद्रे बायोवेस्ट ची विल्हेवाट आपापल्या पद्धतीने लावत आहेत. यासाठी बायोवेस्टची योग्य प्रकारे विल्हेवाट लावण्यात यावी यासाठी नियोजन करण्याची मागणी करण्यात आली.