आरे सुरूबनात लागलेला वणवा पाच तासांनी आटोक्यात

रत्नागिरी:- रत्नागिरी शहरालगत असलेल्या आरे येथील सुरूबनात गुरुवारी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास अचानक आग लागली. बघता बघता आगीने रुद्रावतार धारण केला. आज लागल्याची माहिती मिळताच ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेत बचावकार्य सुरू केले. मध्यरात्री एक वाजता आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले.

आरे समुद्रकिनारी असलेल्या सुरूबन येथे गुरुवारी रात्री उशिरा मोठी आग लागली. सुरूच्या झाडाच्यानजिक मोठ्या प्रमाणात सुका पालापाचोळा असल्याने आगीने कमी वेळात रौद्ररूप धारण केले. त्यामुळे अनेक झाडांचे नुकसान झाले. आग लागल्याचे कळताच घटनास्थळी ग्रामस्थांनी धाव घेतली. आग लागल्याचे वनविभागाला कळविण्यात आले. ग्रामस्थांनी आग विझवण्यासाठी प्रयत्न सुरू केले. पोलीस पाटील आदेश कदम, ग्रामपंचायत सदस्य आशिष कानगुटकर व त्यांचे सहकारी व ग्रामस्थांनी ही आग विझवण्याचा प्रयत्न केला. तसेच वनविभागाचे कर्मचाऱ्यांनीही या ठिकाणी धाव घेतली.
या आगीत पाच ते सहा सुरुची झाडे जाळून खाक झाली. रात्री आठ वाजता लागलेली आग रात्री एक वाजता नियंत्रणात आली. ग्रामस्थांनी जीवावर उदार होत आग विझवण्यासाठी मेहनत घेतली. या सुरूबनाच्या ठिकाणी अनेकजण पार्ट्या करण्यासाठी हजेरी लावत असतात. यावेळी धूम्रपान करताना टाकण्यात येणाऱ्या सिगारेटमुळे ही आग लागल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.