आरे- वारे मार्गावर दुचाकीची पादचाऱ्याला धडक; पादचारी ठार 

रत्नागिरी:- रत्नागिरी-गणपतीपुळे मार्गावरील वारे येथे सोमवारी रात्री दुचाकीने दिलेल्या धडकेत पादचाऱ्याचा जागीच मृत्यू झाला. या घटनेची नोंद ग्रामीण पोलीस स्थानकात करण्यात आली असून दुचाकीस्वारा विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास ग्रामीण पोलीस करत आहेत. 

शैलेंद्र पंढरीनाथ वारेकर (38,रा.वारे) हे आरे-वारे पॉईंट येथे टपरी चालवतात. दिवसभर टपरीवर काम केल्यानंतर रात्री ते पायी चालत घर गाठतात. सोमवारी रात्री नेहमीप्रमाणे टपरी बंद करून ते वारे येथील आपल्या निवासस्थानी जात असताना भरधाव वेगाने आलेल्या दुचाकी क्रमांक (एमएच-08-एएम-7893) ने जोरदार धडक दिली. त्यानंतर शैलेंद्र वारेकर हे रस्त्यावरच पडले. त्यांना स्थानिक ग्रामस्थांनी जिल्हा शासकीय रूग्णालयात दाखल केले. परंतु ते मृत असल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी घोषित केले.
शैलेंद्र वारेकर यांचा अपघाती मृत्यू झाल्याचे वृत्त वारे गावात पसरताच ग्रामस्थ, नातेवाईकांनी जिल्हा रूग्णालयात धाव घेतली होती. घटनेची माहिती मिळाल्यानंतर श्री.इंदुलकर, श्री.गायकवाड यांनी जिल्हा रूग्णालयात धाव घेत मृतदेहाचा पंचनामा केला. त्यानंतर दुचाकीस्वाराविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास ग्रामीण पोलीस करत आहेत. या घटनेच्या दुसऱ्या दिवशी मंगळवारी आरे वारे पॉइंट वरील टपरी चालक व्यावसायिकांनी आपला व्यवसाय बंद ठेवत वारेकर यांना श्रद्धांजली वाहिली.