रत्नागिरी:- तालुक्यातील प्रसिध्द आरे-वारे पर्यटनस्थळावर खाडी मुखाजवळ पोहणार्या पर्यटकांना सुरक्षित ठेवण्यासाठी प्रशासनाकडून कोणतीच कार्यवाही होत नाही. यासंदर्भात रविवारी (ता. 28) घडलेल्या दुर्घटनेचे वृत्त दै. रत्नागिरी एक्स्प्रेसने प्रसिध्द केल्यानंतर पोलिस प्रशासनासह ग्रामपंचायतीकडून तात्काळ दखल घेण्यात आली आहे. किनार्यावरील पर्यटकांना वेळीच सतर्क करणारे पोलिस पाटील आदेश कदम यांच्याशी संवाद साधून पेट्रोलिंग आणि जीवरक्षक नियुक्तीविषयी चर्चाही केली.
गणपतीपुळेकडे जाणार्या मार्गावर आरे-वारे बीच आणि टेकडी परिसर आहे. या ठिकाणी शनिवार, रविवारी सुट्टीच्या दिवशी पर्यटकांची प्रचंड गर्दी होते. उत्साही पर्यटक येथील खाडीच्या मुखाजवळ पोहण्यासाठी उतरतात. हा भाग धोकादायक असल्यामुळे बुडून दुर्घटनाही घडते. रविवारी सायंकाळी सहा पर्यटकांना वेळीच सतर्क केल्यामुळे मोठा अनर्थ टळाला. पोलिस पाटील आदेश कदम यांचे लक्ष गेल्यामुळे अनुचित प्रकार घडलेला नाही. याठिकाणी येणार्या पर्यटकांकडूनही सुरक्षेविषयक माहिती फलक लावणे आवश्यक असल्याचे सांगण्यात आले. आरे-वारे किनार्यावर जीवरक्षक नेमणुकीविषयीच्या विषयाला चालना दिली. सोमवारी प्रसिध्द झालेल्या वृत्ताची दखल पोलिस प्रशासनाकडून घेण्यात आली. रविवारी पर्यटकांसंदर्भात घडलेल्या घटनेची माहिती पोलिस पाटील कदम यांच्याकडून घेतली. तसेच ग्रामपंचायतीकडूनही कदम यांच्याशीही संवाद साधला. पर्यटकांची गर्दी असेल तेव्हा पेट्रोलिंगसाठी पोलिस नियुक्त करणे आणि ग्रामपंचायतीमार्फत जीवरक्षक नेमण्याविषयी चर्चा झाल्याचे श्री. कदम यांनी सांगितले.