रत्नागिरी:- पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी पर्यटन संचालनालयाने कोकणातील तीन समुद्र किनारी बीच शॅक्स (चौपाटी कुटी) उभारण्याचा निर्णय घेतला होता. त्याचा प्रस्ताव अंतिम टप्प्यात असून पर्यावरणीय परवानगीसाठी कोस्टल मॅनेजमेंट अॅथोरटीकडे पाठविण्यात आला आहे. यामध्ये रत्नागिरीतील आरे-वारे किनार्याचा समावेश करण्यात आला आहे.
पर्यटन व्यावसायाला चालना देण्यासाठी तत्कालीन महाविकास आघाडी सरकारने विविध संकल्पना कोकणात राबविण्याचा निर्णय घेतला होता. त्यामध्ये गोव्याच्या धर्तीवर बिच सॅक उभारण्याचा निर्णय घेण्यात आला होता. कोकणच्या विकासाला चालना देण्यासाठी बीच शॅक धोरण तत्कालीन महाविकास आघाडी सरकारने आखले होते. पायलट प्रोजेक्ट म्हणून कोकणातील आठ किनार्यांची निवड केली होती. त्यातील रत्नागिरी जिल्ह्यातील आरेवारे आणि गुहागर, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुणकेश्वर, तारकर्ली या किनार्यांचा समावेश होता.
महाराष्ट्र किनारपट्टी क्षेत्र व्यवस्थापन प्राधिकरणाच्या सहमतीने पर्यटन संचालनालयाने निश्चित केलेल्या जागेवर तात्पुरती चौपाटी कुटी उभी करण्यासाठी परवाना देण्यात येणार आहे. एका चौपाटीवर कमाल 10 कुटी उभारता येतील. स्थानिकांना ते उभारण्यासाठी प्राधान्य देण्यात येणार आहे. बिच शॅक्स उभारण्यासाठी पर्यावरणाविषयक परवानग्या घ्याव्या लागणार आहेत. त्यासाठीचा प्रस्ताव कोस्टल झोन मॅनेजमेंटकडे पाठविण्यात आला आहे. त्यांच्याकडून लवकरत तो प्रस्ताव मंजूर होईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
रत्नागिरीतील आरे-वारे किनारी दहा शॅक्स उभारण्याचे नियोजन केले आहे. तसेच पर्यटकांसाठी किनार्यावर कॉमन फॅसीलीटी सेंटरही उभारले जाईल. वाहनांची कोंडी होऊ नये म्हणून पार्किंग सुविधाही दिली जाणार आहे. यासाठी किनारी भागात किमान तिन एकर जागा अपेक्षित आहे. आरे-वारे परिसरात हा प्रकल्प झाल्यास पर्यटकांसाठी पर्वणीच ठरणार आहे. या प्रकल्पामध्ये निर्माण होणार्या रोजगारासाठी स्थानिक व्यक्तींना 80 टक्के जागा राखीव ठेवण्यात येतील. या कुट्यांचे तीन वर्षाकरिता वाटप करण्याचे निश्चित झाले होते. एका कुटीचा आकार आकार 15 फूट लांबी आणि 15 फूट रुंद आणि 12 फूट उंच असेल. गाळ्याच्या समोर बैठक व्यवस्थेसाठी 20 फूट लांब आणि 15 फूट रुंद छत टाकता येईल. कुटी मिळणार्या व्यक्तीकरिता परवान्यासाठी प्रवेश शुल्क आकारले जाणार आहे.