आरे येथे 50 गुंठे जागेत कांदळवन रोपवन निर्मिती

रत्नागिरी:- किनारी प्रदेशातील जीवन आणि तेथील स्थानिकांच्या उपजिविकेसाठी महत्वाच्या असलेल्या कांदळवनांच्या संरक्षण आणि संवर्धनाला केंद्रशासनाने सर्वोच्च प्रधान्य देत मिष्टी योजनेंतर्गत रत्नागिरी जिल्ह्यातील आरे येथे कांदळवन रोपवन निर्मिती केली जाणार आहे. सुमारे 50 गुंठे जमिनीत दोन हजारहून अधिक कांदळवन रोपांची लागवड करण्यात येणार असून जागतिक पर्यावरण दिनी 5 जून रोजी याचा आरंभ होणार आहे.

मिष्टी योजनेंतर्गत देशातील एकूण 75 ठिकाणी व त्यातील महाराष्ट्रातील 15 स्थळांवर कांदळवन रोपवन केले जाणार आहे. यामध्ये मुंबई उपनगरात मुलुंड, ठाणे जिल्ह्यातील काल्हेर आणि वडूनवघर, रायगड जिल्हयातील वारळ येथील 2 ठिकाणी, वाघण, पालव येथे प्रत्येकी एक, पालघर जिल्ह्यात सोनावे, टेंभोडे, वडाडे, वेलांगीतील प्रत्येकी एक आणि आसनगावातील 2 ठिकाणी, रत्नागिरी जिल्ह्यात आरे व सिंधुदूर्ग जिल्ह्यातील मिठबाव या स्थळांचा समावेश आहे. एकूण 55.28 हेक्टर कांदळवन क्षेत्रावर हे रोपवन केले जाणार आहे. या योजनेमुळे कांदळवनांचे पुनर्संचयन होवून स्थानिकांना नवीन उपजिविकेच्या संधी उपलब्ध होतील आणि निसर्ग पर्यटनालाही चालना देण्यात येणार आहे.

पर्यावरण दिनी कांदळवन रोप लागवडीचा आरंभ होणार आहे. आरे किनारी मोठ्या प्रमाणात कांदळवन क्षेत्र आहे. समुद्राला लागुनच किनारी भागात मोकळा भुभाग आहे. त्यातील पन्नास गुंठे परिसरात कांदळवनांची निर्मिती केली जाणार आहे. आरे येथे रोपवन लागवडीचा आरंभ पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी जिल्ह्यातील खासदार, आमदार यांना निमंत्रित करण्यात आले आहे. तसेच मुंबई उपनगर येथे वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते कार्यक्रम होणार आहे.