रत्नागिरी:- तालुक्यातील पर्यटनासाठी हॉटस्पॉट असलेल्या आरे-वारे बिचवर पर्यटकांची रविवारी (ता. 28) प्रचंड गर्दी आहे. येथे खाडीचे मुख असल्यामुळे भरती-ओहोटीवेळी खोल खड्डा तयार होतो. त्यात पर्यटक सापडल्यास दुर्घटना घडू शकते. यापुर्वी अनेक घटना घडल्या आहेत. आजही सहा पर्यटकांवर अशीच वेळ आली होती; मात्र पोलिस पाटील आदेश कदम यांनी वेळीच किनार्यावर धाव घेत त्या पर्यटकांना माघारी बोलावले. त्यामुळे अनुचित प्रकार टळला. या किनार्यावर जीवरक्षक नेमण्यासंदर्भात प्रशासनाकडून कार्यवाही झाली नसल्याने तिव्र नाराजी व्यक्त केली होत आहे.
गणपतीपुळेकडे जाणार्या मार्गावर आरे-वारे बीच आणि टेकडी परिसर आहे. निसर्गाने या किनार्याला भरभरुन दिले आहे. त्यामुळे पर्यटक सुट्टीच्यावेळी याठिकाणी थांबतात. उन्हाळी सुट्ट्या सुरु असल्याने अनेकांचा कल गणपतीपुळेकडे राहतो. आज रविवार असल्यामुळे हजारो पर्यटकांनी आरे-वारे किनारी गर्दी केली होती. अनेकजणं शांत किनार्यावर पोहण्याचा आनंद घेत होते. याच ठिकाणी खाडी समुद्राला मिळते. मुखाचा भाग असल्यामुळे भरतीच्यावेळी खड्डा तयार होतो. वाळू अचानक सरकत असल्यामुळे पोहायला गेलेल्या लोकांना काहीच कळत नाही. असाच प्रकार आज सायंकाळी परजिल्ह्यातून फिरायला आलेल्या सहा पर्यटकांबाबत घडला असतो. मुखाजवळील भागात ते पाण्यात उतरले होते. हे सर्व पोलिस पाटील आदेश कदम यांनी पाहीले. त्यांनी तात्काळ धाव घेत त्या पर्यटकांना शिट्टी मारुन त्या परिसरातून बाहेर येण्यास सांगितले. साधारण चार फुटापेक्षा अधिक पाण्यात ते गेले होते. त्या पर्यटकांना वेळीच सुचना दिल्यामुळे अनर्थ टळला. किनारी भागात वारेही वाहत असल्याने लाटांचा वेग वाढला आहे.
आरे-वारे बिचवर आतापर्यंत सुमारे पाचहून अधिक घटनांमध्ये पर्यटक बुडून मृत पावले आहेत. पाच वर्षांपुर्वी अशी एक दुर्घटना घडल्यानंतर जिल्हाप्रशासनाकडून या किनार्यावर जीवरक्षक नेमण्याच निर्णय घेतला होता. जिल्हा परिषद आणि ग्रामपंचायत यांनी जीवरक्षकाला मानधन द्यावयाचे होते; परंतु ग्रामपंचायतीचे आर्थिक उत्पन्न कमी असल्यामुळे मानधनाचा भार उचलणे अशक्य आहे. या परिस्थितीत जिल्हा प्रशासनाकडून निर्णय घेणे अपेक्षित होते. यावर अजुनही कार्यवाही झालेली नाही. दुर्घटना घडली की प्रशासनाकडून बैठका घेतल्या जातात. पण त्यानंतर प्रत्यक्ष कार्यवाही होत नाही, अशी चर्चा किनार्यावर सुरु होती.
आरे-वारे येथे सध्या पर्यटकांची प्रचंड गर्दी आहे. समुद्रामध्ये पोहणे सुरक्षित आहे, पण खाडी मुखाजवळ पाण्यात जाणे धोकादायक आहे. आजही सहा पर्यटकांना वेळीच सतर्क केले. सुट्टीच्या कालावधीत जीवरक्षक नेमणे आवश्यक आहे.
- आदेश कदम, पोलिस पाटील, आरे