रत्नागिरी:- आम्ही काल, आज आणि उद्या कायम ठाकरे साहेबांचेच शिवसैनिक आहोत. काल होतो… आजही आहोत… आणि उद्या देखील राहू… ही काळ्या दगडावरची रेष आहे. आम्ही कायम ठाकरे साहेबांचेच शिवसैनिक आहोत. कुणी काही बोललं म्हणून निष्ठा कमी होणार नाही, असे जिल्हा परिषद माजी अध्यक्ष रोहन बने यांनी सांगितले.
अतिथी देवो भव… ही कोकणची संस्कृती आहे. घरात आलेल्या माणसाचा सन्मान करणे हे सर्वच जण करत असतात. याच हेतूमधून घरी आलेल्या पालकमंत्री उदय सामंत यांचे आदरातिथ्य करण्यात आल्याचे रोहन बने यांनी सांगितले. राजकारण आपल्या बाजूला आणि रितिरिवाज आपल्या जागेवर असले पाहिजे असे ते म्हणाले. सगळे नितीनियम एकाच तराजूत तोलणे योग्य नाही. विकासकामाच्या कार्यक्रमात राजकीय वक्तव्य ही कायमच होत राहतात. याला देवरुखमध्ये झालेला कार्यक्रम अपवाद ठरणार नाही. दोन विरोधी पक्षातील नेतृत्व एकत्र आली की नेहमीच चर्चा तर होते आणि त्यात एक मंत्री आणि त्यांच्या कार्यक्रमात विरोधी पक्षातील तरुण नेतृत्व असेल तर आणखीनच भर पडते असे रोहन बने म्हणाले.
मागील वर्षभरात घडलेल्या राजकीय घडामोडीमुळे तर राजकारणातील प्रत्येक घडामोड महत्वाची बनली आहे. आमच्या घरी जेवून गेल्यामुळे आमची शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे, उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्यावरील निष्ठा कमी होणार नाही. चर्चा तर होतच राहणार आणि त्याला कोणी काहीच करू शकणार नाही असे बने म्हणाले. पालकमंत्री घरी जेवून गेल्यावर मीडियावर आलेली वृत्त निव्वळ खोडसाळपणाच म्हटला पाहिजे, अशी परखड प्रतिक्रिया माजी जिल्हा परिषद अध्यक्ष रोहन बने यांनी व्यक्त केली. शिवसैनिक उद्धव ठाकरे साहेब यांच्या सोबत ठामपणे उभा आहे. त्यामुळे अशा अफ़वा उठवण्याची विरोधकांना सवयच आहे. आम्ही काल, आज आणि उद्या कायम ठाकरे साहेबांचेच शिवसैनिक आहोत असे रोहन बने यांनी सांगितले.